महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – २५ सप्टेंबर – कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे थेट परिणाम हे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर झाले. नोकरीवर गदा येण्यापासून मग त्याच्याशी निगडीत संपूर्ण साखळीच अशी काही गुंतली की, सारी गणितंच कोलमडून गेली. काहींना आपल्या नोकरीला मुकावं लागलं आहे, काहींच्या वेतनात कपात झाली आहे तर, काहींना नोकरी असूनही जवळपास गेले पाच- सहा महिने वेतनच मिळालेलं नाही. ही संकटं कमी म्हणून आता काही शाळांकडून पालक वर्गाला फी भरण्याची सक्ती करण्यात येत आहे ज्यामुळं आता नवी समस्या पालकांपुढे उभी राहिली आहे.
अनेकदा उच्च शिक्षणासाठी कर्ज काढलं जातं. पण, आता नर्सरी पासूनच्याच शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ येते की काय, अशाच पेचात हे पालक पडले आहेत. १ ते २ तासाच्या ऑनलाईन शिक्षणासाठी नेहमी प्रमाणे फी आकारली जात आहे. सरकारने ह्यात लक्ष घालवे आणि शाळा सुरु होत नाही तो पर्यंत फी साठी तगादा लावू नये असे शिक्षण संस्था ना कळवावे .. परिणामी आमची परिस्थिती जाणून घ्या आणि त्यानंतर अशी कोणतीही मागणी करण्याचा विचार करा असा संतप्त सूर पालकांनी आळवला आहे.