Pune Metro: विमानतळाची वाट मोकळी, पुणेकरांना मेट्रोची नवी झेप

Spread the love

Loading

कल्याणीनगर ते लोहगाव मार्गाला हिरवा कंदील; शहराच्या चारही मेट्रो मार्गांना मिळणार थेट विमानतळाची जोड

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०३ जुलै २०२६ ।। पुणेकरांनी वर्षानुवर्षे एकच प्रश्न विचारला होता—”मेट्रो आली, पण विमानतळ अजूनही रिक्षा-टॅक्सीच्या दयेवरच का?” अखेर या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे. कल्याणीनगर मेट्रो स्थानकापासून थेट लोहगाव विमानतळापर्यंत नवीन मेट्रो मार्ग उभारण्याचा निर्णय झाल्याने पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा टप्पा गाठला जाणार आहे. शहरभर मेट्रोचं जाळं विणूनही विमानतळ मात्र त्यापासून दूर राहिलं होतं. त्यामुळे लाखो प्रवाशांना मेट्रोनंतर पुन्हा कॅब, रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. आता हा विस्कळीत दुवा जोडण्याचा निर्णय म्हणजे पुणेकरांच्या संयमाचं फळच म्हणावं लागेल. वाहतूक कोंडी, वाढते प्रवासखर्च आणि वेळेची नासाडी यावर हा मार्ग मोठा उपाय ठरणार आहे.

या निर्णयामागे केवळ घोषणा नाही, तर व्यवहार्यतेचा अभ्यासही आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने महा मेट्रो आणि पुणे महानगरपालिकेने विविध पर्यायांचा सखोल अभ्यास केला. अखेर कल्याणीनगर ते लोहगाव विमानतळ हा मार्ग सर्वाधिक उपयुक्त ठरला. आतापर्यंत येरवडा किंवा रामवाडीपर्यंत मेट्रोने पोहोचल्यानंतर विमानतळ गाठण्यासाठी पुन्हा रस्त्यावरील वाहतुकीचा सामना करावा लागत होता. “मेट्रोने आलो, पण विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा ट्रॅफिकमध्ये अडकलो,” अशी पुणेकरांची व्यथा आता इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. मेट्रोचा खरा अर्थ म्हणजे अखंड प्रवास; मध्येच रिक्षेची गरज पडली तर तो विकास नव्हे, ती अपूर्ण योजना ठरते.

या नव्या मार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो फक्त विमान प्रवाशांसाठी मर्यादित राहणार नाही. सध्या सुरू असलेली पीसीएमसी–स्वारगेट आणि वनाझ–रामवाडी ही दोन्ही मेट्रो मार्गिका सिव्हिल कोर्ट व कल्याणीनगरद्वारे जोडल्या जाणार आहेत. त्यातच हिंजवडी–शिवाजीनगर ही तिसरी आणि खडकवासला–खराडी ही चौथी प्रस्तावित मार्गिकाही कल्याणीनगरशी जोडली जाणार आहे. म्हणजे भविष्यात शहराच्या कोणत्याही भागातून मेट्रो पकडली की थेट विमानतळापर्यंत पोहोचणं शक्य होईल. ही केवळ मेट्रोची लाईन नाही; पुण्याच्या वाहतुकीच्या नकाशावर आखलेली नवी जीवनवाहिनी आहे. विमान पकडण्यासाठी दोन तास आधी घराबाहेर पडण्याची सक्ती कमी होईल आणि प्रवास अधिक सुसूत्र बनेल.

पुण्याचा विस्तार झपाट्याने होत आहे, पण पायाभूत सुविधा त्याच वेगाने वाढल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या प्रकल्पाकडे नागरिक आशेने पाहतात. विमानतळाला मेट्रो जोडण्याचा हा निर्णयही त्याच आशेचा भाग आहे. मात्र, फलक उभारून आणि भूमिपूजन करून विकास होत नाही; वेळेत काम पूर्ण करणं हीच खरी परीक्षा असते. पुणेकरांनी अनेक प्रकल्पांच्या तारखा पुढे ढकलताना पाहिल्या आहेत. त्यामुळे या मार्गाचं कामही कागदावर न राहता प्रत्यक्ष रुळांवर धावलं पाहिजे. कारण विमानतळापर्यंतची मेट्रो ही चैनीची गोष्ट नाही, तर वाढत्या महानगराची अपरिहार्य गरज आहे. आता निर्णय झाला आहे; पुढची वाट प्रशासनाने वेगाने चालण्याची आहे, धावण्याची नाही तर किमान रेंगाळू न देण्याची तरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *