पिंपरी-चिंचवड पाण्याखाली ; प्रशासनाचा पुरता बोजवारा उडाला

Spread the love

Loading

रेड अलर्टपेक्षा रस्त्यांवरचे पाणी मोठे; अंडरपास, पूल बंद, नागरिकांना घरातच थांबण्याचा इशारा

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ जुलै २०२६ ।। Rain Updates: पाऊस पडला की नद्या भरतात, धरणे ओसंडतात, हे निसर्गाचे नियम आहेत. पण शहरात दोन-तीन तास मुसळधार पाऊस झाला आणि रस्तेच नद्या बनले, अंडरपास तलाव झाले, पूल पाण्याखाली गेले, तर तो निसर्गाचा नव्हे तर नियोजनाचा पराभव असतो. पिंपरी-चिंचवडमध्ये नेमके हेच चित्र पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटीचे फलक उभे करणाऱ्यांनी बहुधा पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारींची फक्त फित कापली असावी; कारण प्रत्यक्षात नागरिक मात्र चिखल, पाणी आणि वाहतूक कोंडीत अडकले आहेत. प्रशासनाने “अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका” असा सल्ला दिला असला, तरी नागरिकांचा प्रश्न सरळ आहे—करोडो रुपये खर्च करून उभारलेले शहर दोन दिवसांच्या पावसातच गुडघ्यावर का बसते? प्रत्येक पावसात तीच कारणं, तीच आश्वासनं आणि तोच गोंधळ… मग बदल नेमका कुठे झाला ?

वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या यादीकडे नजर टाकली, तर शहराचा नकाशाच जणू लाल रंगाने रंगवलेला दिसतो. भोसरीतील बाणाचा ओढा, माई वडेवाले चौक आणि क्लाऊड नाईन परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रेंगाळली आहे. बावधनमध्ये राधा चौक, ननावरे अंडरपास आणि भुगाव परिसरात वाहनांचा वेग मुंगीसारखा झाला आहे. चाकणमधील वाकी फाटा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वाकडमधील ताथवडे अंडरपास आणि थेरगावचा रिव्हर व्ह्यू पूल वाहतुकीसाठी बंद असून, पुनावळे अंडरपासमध्ये वाहनचालकांची कसोटी लागली आहे. सांगवी, निगडी, पिंपरी, हिंजवडी, चिखली, देहूरोड आणि तळेगावपर्यंत एकाच समस्येने कहर केला आहे. जिथे पहावे तिथे पाणी, बंद रस्ते आणि अडकलेली वाहने. शहराचा प्रत्येक कोपरा प्रशासनाच्या अपुऱ्या तयारीची साक्ष देत उभा आहे.

सर्वाधिक गंभीर परिस्थिती आळंदी परिसरात निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीवरील जुना-नवा पूल, सिद्धबेट पूल, दाभाडे सरकार चौक परिसर तसेच मरकळ गावाचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र आळंदीत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दुसरीकडे म्हाळुंगे येथे नाल्यावरील पूल खचल्याने रस्ता बंद झाला आहे, तर देहूरोडमध्ये सर्व्हिस रोड पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी उघडे मॅनहोल, वाहून गेलेले रस्ते आणि पाण्याखाली लपलेले खड्डे यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असली, तरी संकट टाळण्यापेक्षा संकटानंतर धावपळ करण्याची सवय प्रशासनाने अजून सोडलेली दिसत नाही.

पावसाला दोष देणे सोपे आहे; पण प्रत्येक वर्षी तोच पाऊस येतो आणि प्रत्येक वर्षी शहराची अशीच दुर्दशा होते, याची जबाबदारी कोण घेणार? पावसाचे ढग बदलतात, पण प्रशासनाची तयारी मात्र बदलत नाही. नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहेच; मात्र त्याहून अधिक गरज आहे ती जबाबदारी निश्चित करण्याची. केवळ रेड अलर्ट जाहीर करून कर्तव्य संपत नाही. नागरिकांनीही विनाकारण बाहेर पडणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यांवर धाडस करू नये. कारण निसर्गाचा रुद्रावतार थांबेल, पण नियोजनातील निष्काळजीपणाची किंमत मात्र सामान्य माणसालाच पुन्हा मोजावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *