![]()
संभाजीनगरात दोन ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर एफडीएची धाड; पामतेलासह तब्बल २.९३ कोटींचे संशयित खाद्यतेल जप्त, दोन्ही परवाने तात्काळ निलंबित
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै २०२६ ।। राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेचा वेग दिवसेंदिवस वाढत असून, आता निकृष्ट खाद्यतेलाचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाईचा फास आवळला जात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरातील दोन मोठ्या ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर टाकलेल्या धाडीत तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचे संशयित निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल जप्त करण्यात आले. दूध भेसळीविरोधातील धडक कारवाईनंतर आता खाद्यतेल उद्योगालाही धक्का बसल्याने राज्यभर या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एफडीएच्या पथकाने पैठण येथील बागरिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील बागरिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स या दोन युनिट्सची अचानक तपासणी केली. तपासादरम्यान अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग सुरू असल्याचे उघड झाले. वापरलेले टिन पुन्हा वापरणे, यंत्रसामग्रीवर गंज आणि धूळ साचलेली असणे, दुर्गंधीयुक्त तेलाचे टब, फूड-ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव, तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा नसणे तसेच आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करणे अशा गंभीर त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. या सर्व बाबी ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.
या कारवाईत पामतेल, सोयाबीन तेल, कपाशीचे तेल तसेच अज्ञात वनस्पती तेलाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. संशयित खाद्यतेलाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवालानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या धाडीतून देण्यात आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात एफडीएची मोहीम यापुढेही अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
दरम्यान, मराठवाड्यात बनावट व भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईचाही मोठा परिणाम दिसू लागला आहे. गेल्या महिनाभरातील सलग धाडसत्रामुळे दूध संकलनात तब्बल एक लाख लिटरची घट झाल्याची नोंद झाली आहे. भेसळयुक्त दूध आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधातील मोहिमेमुळे अन्न व्यवसायात खळबळ उडाली असून, नियम मोडणाऱ्यांसाठी आता कुठलीही माफी नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी राज्यभर अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे एफडीएच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.