मोशी दुर्घटनेने हादरलं शहर; संतापाचा उद्रेक

Spread the love

Loading

८३ तासांच्या शोधमोहीमेनंतर नऊ मृतदेह बाहेर; नातेवाईकांचा प्रशासनावर संताप, चौकशीच्या मागणीला जोर

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै २०२६ ।। मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरले आहे. तब्बल ८३ तास अखंड सुरू असलेल्या बचाव आणि शोधमोहीमेनंतर अखेर सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्याची घोषणा प्रशासनाने केली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू, तर नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला असून, बचावकार्याच्या गतीवर आणि संपूर्ण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “एखादा मंत्री अडकला असता तर शेकडो यंत्रणा काही तासांत उभ्या राहिल्या असत्या,” अशी तीव्र भावना व्यक्त करत नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

८ जुलै रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मोशीतील कचरा डेपोमधील प्रचंड कचऱ्याचा ढिगारा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. त्यावेळी इमारतीत २२ कर्मचारी आणि बाहेर एक व्यक्ती अशा एकूण २३ जणांचा जीव धोक्यात आला. दुर्घटना घडताच भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त बचावमोहीम सुरू केली. सुरुवातीच्या काही तासांत पाच जण स्वतः बाहेर पडले, तर आणखी नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ढिगाऱ्याखाली जीवघेणी मोहीम सुरू ठेवावी लागली.

शोधमोहीमेदरम्यान भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि अखेरीस मध्यरात्री वामन कसबे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. काँक्रीटचे अवशेष फोडत, जेसीबी, पोकलेन, डंपर, डॉग स्क्वॉड आणि अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने जवानांनी रात्रंदिवस प्रयत्न केले. सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने ८३ तासांची शोधमोहीम अधिकृतरीत्या समाप्त केली. मात्र, मृतांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंनी आणि आक्रोशाने घटनास्थळावरील वातावरण अधिकच हेलावून गेले.

या दुर्घटनेनंतर कचरा डेपोच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एवढा मोठा कचऱ्याचा ढिगारा कसा कोसळला, सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये नेमकी कुठे त्रुटी राहिली आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दोषींवर कठोर कारवाई, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. मोशी दुर्घटना ही केवळ एक अपघात नसून, प्रशासनाच्या जबाबदारीची कठोर परीक्षा ठरल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *