औषध माफियांवर मुंढेंचा प्रहार; ५० लाखांचा साठा जप्त

Spread the love

Loading

पुण्यातील शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर एफडीएची धाड; विनापरवाना भस्म-रस औषधांचा साठा जप्त, सोलापुरातील मेडिकललाही ‘स्टॉप ॲक्टिव्हिटी’ आदेश

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै २०२६ ।। अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईचा वेग आता केवळ भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा हॉटेलांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली औषधविक्री व्यवसायातील नियमभंग करणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका आयुर्वेदिक औषध दुकानावर टाकलेल्या धाडीत तब्बल ५० लाख ३६ हजार रुपयांचा संशयित भस्म व रस औषधांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे औषध व्यवसायात एकच खळबळ उडाली असून, नियमांना हरताळ फासणाऱ्यांना एफडीएने स्पष्ट इशारा दिला आहे.

विनापरवाना भस्म आणि रस औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘एफडीए’च्या औषध निरीक्षकांनी शुक्रवार पेठेतील ‘कल्पतरू आयुर्वेद’ या दुकानावर अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान प्लास्टिकच्या पिशव्या, बरण्या आणि बाटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भस्म व रस औषधे साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. मात्र, या औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, मुदत समाप्तीची तारीख, उत्पादकाचे नाव-पत्ता किंवा परवाना क्रमांक यांसारखी कायद्याने बंधनकारक माहितीच नमूद करण्यात आलेली नव्हती. एवढेच नव्हे तर दुकान चालकाकडे या औषधांच्या खरेदीची बिले किंवा मालकी सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे संपूर्ण साठा संशयित मानून एफडीएने तो तात्काळ जप्त केला.

दरम्यान, सोलापूरमध्येही औषध विक्रीतील गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. रुग्णांना हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारीनंतर नोबल हॉस्पिटलशी संलग्न फातिमा मेडिकलची तपासणी करण्यात आली. तपासात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ‘शेड्यूल एच’ आणि ‘एच-१’मधील औषधांची विक्री, रुग्णांना औषधांची प्रिस्क्रिप्शन प्रत न देणे, औषध खरेदी-विक्री नोंदींमध्ये तफावत, थंड तापमानात ठेवावयाची औषधे बाहेर ठेवणे तसेच मुदतबाह्य औषधांची योग्य विल्हेवाट न लावणे अशा गंभीर त्रुटी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर संबंधित मेडिकलला ‘स्टॉप ॲक्टिव्हिटी’ आदेश देत व्यवसाय तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

राज्यात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधातील एफडीएची मोहीम दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. दूध भेसळ, निकृष्ट खाद्यतेल, हॉटेल्स, रक्तपेढ्या आणि आता औषधविक्री अशा प्रत्येक क्षेत्रात नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या सलग कारवायांतून देण्यात येत असून, येत्या काळात राज्यभर अशाच धडक तपासण्या सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *