फडणवीस. राऊत भेटी नंतर : पवार, थोरात थेट मातोश्रीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि . २८ सप्टेंबर – मुंबई – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले असले तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भेटीमुळे अस्वस्थ असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘मातोश्री’वर धाव घेतली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.या भेटीबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना या भेटीबाबत माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

राऊत आणि फडणवीस यांच्यातील तब्बल २ तासांची भेट अराजकीय होती आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दै. सामना’च्या मुलाखतीसंदर्भात बोलणे झाल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले असून भाजपच्या प्रवक्त्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. शनिवारी सांताक्रूझ येथील तारांकीत हॉटेलमध्ये राऊत आणि फडणवीस यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

महत्त्व देण्यास नकार

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस-राऊत यांच्या भेटीला फारसे महत्व देण्याचे नाकारले. तर, शरद पवारांसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असते. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राष्टÑवादी काँग्रेसने देखील पवार-ठाकरे भेट ‘रुटिन’ असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात मुख्यमंत्री आणि शरद पवार असंख्यवेळा भेटले आहेत. कधी ते मातोश्रीवर गेले, कधी महापौर बंगल्यावर भेट झाली, तर कधी वर्षावर. दर वेळी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या कामांचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यामुळे त्यात नवीन काही नाही, सरकार व्यवस्थित चालू आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.

सरकार पडेल तेव्हा बघू – फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार आहे. ते कोसळेल तेव्हा पयार्याबाबत विचार करू. मात्र, आम्हाला सरकार बनविण्याची घाई नाही. शिवसेनेसोबत कसलीही राजकीय चर्चा नाही. राऊत यांच्याशी भेट केवळ मुलाखतीसंदर्भात होती.

कोरोनासह विविध कारणांमुळे राज्यातील सरकारविरोधात नाराजी आहे. लोकांमध्ये इतका आक्रोश असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे ‘त्या’ भेटीचे टायमिंग चुकल्याचे म्हणता येईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगितले.

मुख्यमंत्र्यांनाही ‘त्या’ भेटीची कल्पना – राऊत
फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *