![]()
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा इशारा; डॉलर मजबूत, गुंतवणूकदारांनी घाई टाळावी
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै २०२६ ।। Gold Price Update: काही महिन्यांपासून विक्रमी उंचीवर झेपावणाऱ्या सोन्याच्या बाजाराला आता सावधगिरीचा इशारा मिळू लागला आहे. “सोने म्हणजे नेहमीच सुरक्षित” हा समज अजूनही कायम असला, तरी जागतिक आर्थिक समीकरणे बदलू लागली की याच सोन्याची चमकही क्षणात फिकी पडू शकते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालाने गुंतवणूकदारांना नेमकाच हाच इशारा दिला आहे. मजबूत होत चाललेला अमेरिकन डॉलर, वाढणारे ट्रेझरी बॉन्ड यिल्ड आणि फेडरल रिझर्व्हच्या आगामी निर्णयामुळे सोन्यावर दबाव वाढू शकतो. त्यामुळे बाजारातील सध्याची स्थिरता ही कायमस्वरूपी नसून, मोठ्या घसरणीपूर्वीची शांतता ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अहवालानुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात फार मोठी चढ-उतार झाली नसली, तरी अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी बॉन्डचे वास्तविक यिल्ड वाढत आहे. हे यिल्ड सुमारे २.४४ टक्क्यांपर्यंत गेल्यास सोन्यावरील दबाव अधिक तीव्र होऊ शकतो. दुसरीकडे, लंडन बुलियन मार्केटमध्ये सोन्याने पुन्हा वाढ नोंदवत ४,००० डॉलर प्रति औंस हा टप्पा पार केला. मात्र तज्ज्ञांच्या मते ही वाढ नव्या तेजीची सुरुवात नसून, दीर्घकालीन घसरणीतील तात्पुरती उसळी असू शकते. पुढील काळात सोन्याचा दर ३,८५७ ते ३,८८७ डॉलर प्रति औंस या पातळीवर येण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
सोन्याच्या दरामागे केवळ मागणी-पुरवठ्याचे गणित नसते, तर जागतिक अर्थकारणाचा मोठा प्रभाव असतो. डॉलर मजबूत झाला की आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे आकर्षण अमेरिकन मालमत्तांकडे वळते आणि सोन्याची मागणी कमी होते. त्यातच फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवले किंवा महागाई नियंत्रणासाठी कठोर भूमिका घेतली, तर बॉन्ड यिल्ड आणखी वाढू शकतात. अशा परिस्थितीत अल्पकालीन गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय घेण्याऐवजी बाजारातील संकेत समजून घेणे आवश्यक आहे. मात्र भू-राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती किंवा आर्थिक संकट पुन्हा निर्माण झाल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी झपाट्याने वाढू शकते, हेही तितकेच खरे आहे.
म्हणूनच आजचा प्रश्न “सोने घ्यायचे की नाही?” हा नाही; तर “कोणत्या टप्प्यावर आणि किती?” हा आहे. बाजारातील प्रत्येक तेजी ही कायमची नसते आणि प्रत्येक घसरणही विनाशाची घंटा नसते. संयम, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक आणि जागतिक घडामोडींवर सतत लक्ष ठेवणे हीच सध्याच्या काळातील शहाणी भूमिका ठरू शकते. सोन्याचा बाजार अजूनही सुरक्षिततेचे प्रतीक आहे; पण सुरक्षिततेचा अर्थ आंधळा विश्वास नसून, माहितीच्या आधारावर घेतलेला विवेकी निर्णय असतो.