Tukaram Mundhe :क्रिकेट क्लबमध्ये झुरळांचा धक्कादायक ‘सामना’

Spread the love

Loading

FDAचा मुंबईत धडक छापा; स्वच्छतेच्या नावावर निष्काळजीपणाचा भांडाफोड

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै २०२६ ।। राज्यात भेसळ, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासणाऱ्यांविरुद्ध सुरू झालेल्या कारवाईचा वेग आता मुंबईतही स्पष्टपणे दिसू लागला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत यावेळी लक्ष्य ठरले ते शहरातील प्रतिष्ठित क्रिकेट क्लब. नाव मोठे आणि सुविधा भव्य असल्या तरी स्वयंपाकघरात मात्र स्वच्छतेचे नियम धुळीस मिळाल्याचे तपासणीत उघड झाले. सामान्य नागरिकांच्या टपऱ्यांवर कारवाई होते, पण मोठ्या आणि प्रभावशाली संस्थांनाही कायद्यापुढे सवलत नाही, हा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.

एफडीएच्या विशेष तपासणीदरम्यान मुंबईतील नामांकित The Cricket Club of India (CCI), MIG Cricket Club (वांद्रे पूर्व) तसेच इतर काही क्रीडा संस्थांच्या कॅटरिंग सुविधांची पाहणी करण्यात आली. तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने CCI चा अन्न परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला. MIG Cricket Club मध्ये परवान्याशिवाय कॅटरिंग सेवा सुरू असल्याचे, स्वयंपाकघरात जिवंत झुरळे आढळल्याचे, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र साठवले जात असल्याचे तसेच अन्न आणि पाण्याच्या आवश्यक चाचण्या नियमितपणे होत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. ही बाब केवळ नियमभंगापुरती मर्यादित नसून ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय आर. के. जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना आणि द विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब येथेही विविध त्रुटी निदर्शनास आल्या. तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लब (मालाड पश्चिम) यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. एफडीएने संबंधित संस्थांना तातडीने त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले असून, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत आवश्यक ती पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे. राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेत यापूर्वी अनेक हॉटेल्स, बेकरी, डेअरी आणि खाद्य व्यवसायांवरही कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई केवळ एका क्लबची किंवा एका शहराची कथा नाही; ती ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला दिलेला इशारा आहे. प्रतिष्ठा, सदस्यसंख्या किंवा आर्थिक ताकद यापैकी कोणतीही गोष्ट स्वच्छतेच्या नियमांपेक्षा मोठी असू शकत नाही. ग्राहक पैसे देतो ते केवळ चवदार अन्नासाठी नाही, तर सुरक्षित आणि स्वच्छ अन्नासाठीही देतो. त्यामुळे अशा धडक मोहिमा सातत्याने सुरू राहिल्या आणि दोषींवर कायदेशीर कारवाई निःपक्षपातीपणे झाली, तरच अन्न सुरक्षेवरील जनतेचा विश्वास अधिक मजबूत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *