महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि . २८ सप्टेंबर – पुणे – उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक स्थिती होत असल्याने वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. राज्यातील अनेक भागात दिवसभर ऊन, सायंकाळी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याने पिकांची काढणी खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी अचानक होत असलेल्या पावसाने भिजून नुकसान होत आहे.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, सायंकाळनंतर अचानक ढग भरून येत असून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. कुडाळ,कणकवली, लांजा, रत्नागिरी, परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या दोन ते चार दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यास भात काढणीला सुरुवात होईल.
मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक, नंदुरबार, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शेवगाव येथे सर्वाधिक ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अक्कलकुवा, चाळीसगाव, गगणबावडा येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने पिके आडवी झाल्याचे चित्र होते. शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. परभणी जिल्ह्यांतील ३४ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी शहर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यांतील १८ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. यामुळे सोयाबीन, तूर, ज्वारी पिकांचे नुकसान झाले. विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाने प्रभाव कमी झाला आहे.