![]()
उघड्या तारांचे जाळे नागरिकांच्या दारात; दुर्घटनेनंतरच जाग येणार का?
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट २०२६ ।। पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या गप्पा रंगत असताना शहराच्या रस्त्याच्या कडेला मात्र विजेचे मृत्यूचे सापळे उभे आहेत. महावितरणने ग्राहकांना वीज जोडणी देण्यासाठी उभारलेले डीपी बॉक्स अनेक ठिकाणी देखभालीअभावी धोकादायक बनले आहेत. पिंपरीतील गांधीनगर परिसरातील एका डीपीभोवती गुंतलेल्या असंख्य तारा, उघडी वायरिंग आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना पाहिल्या की प्रश्न पडतो—वीजपुरवठा नागरिकांसाठी आहे की नागरिकांनी विजेपासून स्वतःचे रक्षण करायचे? रस्त्यालगत, सोसायट्यांसमोर आणि अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या या यंत्रणांभोवती लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांची सतत वर्दळ असते. पावसाळ्यात ओलावा आणि पाणी साचल्याने विद्युतधोक्याची तीव्रता आणखी वाढू शकते.
गांधीनगर परिसरातील संबंधित डीपीवर अनेक मीटर जोडण्यासाठी अनियोजित पद्धतीने वायरिंग करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. परिणामी तारा एकमेकांत गुंतलेल्या असून काही ठिकाणी त्या उघड्यावर लोंबकळताना दिसतात. डीपीभोवती योग्य संरक्षण नसल्याने शॉर्टसर्किट, विद्युत धक्का किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे अशा यंत्रणांची नियमित तपासणी आणि देखभाल ही केवळ कागदी प्रक्रिया राहता कामा नये. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरच यंत्रणा हलणार असेल, तर अपघात होण्यापूर्वी खबरदारी घेण्याचा अर्थच काय? वीज बंद झाल्यावर अंधार दिसतो; पण उघडी वायरिंग दिसण्यासाठी दुर्घटना होण्याची गरज नसते!
पुण्यात उघड्या विद्युत वायरिंगमुळे ज्येष्ठ महिलेचा जीव गेल्याची घटना ताजी असताना पिंपरी-चिंचवडमधील अशा धोकादायक स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रत्येक डीपीभोवती सुरक्षित कुंपण, व्यवस्थित वायरिंग आणि आवश्यक इन्सुलेशन आहे का, याची शहरव्यापी तपासणी होणे आवश्यक आहे. विशेषतः पावसाळ्यात सखल भागातील विद्युत यंत्रणा पाण्याच्या संपर्कात येऊ नये यासाठी अतिरिक्त खबरदारी अपेक्षित आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असताना ‘अपघात झाला की कारवाई’ हा सरकारी कारभाराचा जुना फॉर्म्युला बदलायला हवा. सुरक्षित वीजपुरवठा म्हणजे केवळ वीज उपलब्ध असणे नव्हे; ती वीज नागरिकांच्या जीवाला धोका न पोहोचवता घरापर्यंत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान, गांधीनगर परिसरातील संबंधित डीपीची पाहणी करून तांत्रिक तपासणी करण्यात येईल, असे महावितरणचे सहायक अभियंता राहुल पालखे यांनी सांगितले. असुरक्षित वायरिंग किंवा तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आढळल्यास नियमानुसार उपाययोजना करण्यात येतील आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. घरांसमोरील धोकादायक मीटर वायरिंग योग्य बॉक्समध्ये बसविण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आता नागरिकांना आश्वासन नको, प्रत्यक्ष दुरुस्ती हवी आहे. कारण विजेच्या तारा गुंतल्या असतील तर प्रश्न फक्त वायरिंगचा नसतो; त्या तारांमध्ये एखाद्या कुटुंबाचे आयुष्य गुंतलेले असते.
