२० वर्षांपासून मोबदला नाही; पोलिसांत तक्रार करूनही कारवाई नसल्याचा धुमाळ यांचा दावा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट २०२६ ।। कौटुंबिक जमिनीच्या विकासाच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा तसेच धमकावल्याचा आरोप करीत विनोद अनंता धुमाळ यांनी बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप चोरडिया यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत धुमाळ यांनी सोमवारी (दि. ३) पिंपरीतील नमस्कार हॉटेल येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकासासाठी २००६ मध्ये झालेल्या करारानुसार मोबदल्यात दुकान आणि फ्लॅट देण्याचे मान्य करण्यात आले होते, मात्र तब्बल दोन दशके उलटूनही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी दापोडी पोलिसांकडे केली आहे.
धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार, २२ डिसेंबर २००६ रोजी कुलमुखत्यारपत्र दस्त क्रमांक १०३९७/२००६ आणि विकसन करारनामा दस्त क्रमांक १०३९६/२००६ हवेली क्रमांक १७ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आला होता. या व्यवहारात मिळकतीच्या विकासाच्या मोबदल्यात व्यावसायिक बांधकामातील तळमजल्यावर एक दुकान तसेच ६५० चौरस फुटांचा सुपर बिल्ट-अप फ्लॅट चार वर्षांत देण्याचे मान्य करण्यात आल्याचे धुमाळ यांनी सांगितले. मात्र, अनेक वर्षे पाठपुरावा करूनही विकासकाम सुरू झाले नाही किंवा ठरलेला मोबदला मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मिळकत परत देण्याची अथवा मोबदला देण्याची मागणी केल्यानंतर वाद वाढल्याचे त्यांनी सांगितले.
याचदरम्यान आपल्याला आणि कुटुंबीयांना गंभीर स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा त्यांचा दावा आहे. संबंधित व्यक्तींनी आर्थिक व राजकीय प्रभावाचा उल्लेख करून पोलिसांत गेल्यानंतरही काही होणार नाही, अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात दापोडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, तक्रारीसोबत व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि इतर पुरावे पोलिसांकडे दिल्याचे धुमाळ यांनी स्पष्ट केले. मात्र, अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नाही; कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे,” असे धुमाळ यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कुणाल चोरडिया यांची या आरोपांवरील स्वतंत्र बाजू उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आरोपांची सत्यता तपासणे आणि पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.