पक्ष नाही, सरकारवर दबाव! CJPच्या बैठकीत GEN Zच्या राजकारणाचा पुढचा अध्याय ठरणार
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑगस्ट २०२६ ।। अभिजित दिपके यांनी राजकारणाच्या पटावर आणखी एक अनपेक्षित चाल खेळली आहे. नवा राजकीय पक्ष उभारून थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याऐवजी सरकारवर दबाव टाकणारा दबावगट उभारण्याचा निर्णय कॉक्रोच जनता पार्टीने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देशभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय ‘कॉक्रोच कॉन्क्लेव्ह’मध्ये संघटनेचा पुढील रोडमॅप निश्चित केला जात आहे. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभर आंदोलन उभे करून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर दिपके आता थेट सत्तेवर अंकुश ठेवण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. राजकारणात पक्ष स्थापन करून खुर्ची मिळवण्याची घाई करण्यापेक्षा, खुर्चीवर बसलेल्यांची खुर्ची हलवण्याची ताकद निर्माण करायची, असा या भूमिकेचा सरळ अर्थ काढला जात आहे.
दिपके यांना नव्या पिढीचा राजकीय चेहरा म्हणून पाहिले जात असतानाच ‘CJP निवडणूक लढवणार नाही’ या घोषणेने सध्याचे चित्र काहीसे बदलले आहे. कारण पक्ष उभारणे म्हणजे उमेदवार, मतदारसंघ, पैसा, संघटन आणि निवडणूक यंत्रणा यांची डोकेदुखी; त्यापेक्षा दबावगट उभा करणे म्हणजे मुद्दा पकडायचा, तरुणांना एकत्र करायचे आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडायचे. भारताच्या राजकीय इतिहासात अशा दबावगटांनी सरकारला अनेकदा झुकवले आहे. मराठा क्रांती मोर्चा, भारतीय किसान युनियन, संयुक्त किसान मोर्चा, भारतीय मजदूर संघ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांसारख्या संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारसमोर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे दिपकेंचा प्रयोग हा केवळ राजकीय स्टंट आहे की नव्या प्रकारच्या राजकीय संघटनेची सुरुवात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
मात्र इतिहासाचा दुसरा धडा अधिक महत्त्वाचा आहे. दबावगट म्हणून सुरू झालेल्या अनेक चळवळी पुढे राजकीय पक्षात बदलल्या आहेत. मराठी माणसाच्या प्रश्नांवर संघटना म्हणून उभी राहिलेली शिवसेना पुढे निवडणुकीच्या राजकारणात उतरली. आणीबाणीविरोधातील जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जनता पक्षाचा जन्म झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे निवडणूक राजकारणात उतरली. अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. म्हणजे आंदोलनाला जनाधार मिळाला की त्याच जनाधाराच्या अपेक्षा वाढतात. आणि अपेक्षा वाढल्या की ‘सरकारला प्रश्न विचारणे’ पुरेसे राहत नाही; ‘सरकारमध्ये जाऊन निर्णय घेणे’ ही मागणीही जन्म घेते.
म्हणूनच आजचा दबावगट उद्याचा राजकीय पक्ष होणार नाही, याची हमी खुद्द काळच देऊ शकतो. सध्या दिपके सरकारवर दबाव ठेवण्याची भाषा करत आहेत; पण जनाधार वाढला, लाखो तरुण त्यांच्या मागे उभे राहिले आणि सत्ताधाऱ्यांना त्यांच्या संघटनेची दखल घ्यावी लागली, तर पुढचा प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहणार—‘फक्त दबाव का, सत्ता का नाही?’ GEN Zच्या राजकारणाचा हा प्रयोग किती दूर जातो, हे येणाऱ्या काळात ठरेल. मात्र दिपकेंनी पारंपरिक राजकारणाच्या बाहेरून राजकीय समीकरणे हलवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, एवढे मात्र नक्की. आज हातात आंदोलनाचा झेंडा आहे; उद्या हातात निवडणुकीची उमेदवारी असेल, तर आश्चर्य वाटायला नको!
