Pune Restrictions: पुण्यात १४ दिवस जमावबंदी; ‘या’ गोष्टींवर बंदी !

Spread the love

Loading

मोर्चे, रॅली, मिरवणुकांना परवानगीची गरज; नियम मोडल्यास थेट कारवाई

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट २०२६ ।। पुणेकरांनी आता गर्दी करताना जरा जपूनच पाऊल टाकावे लागणार आहे. आगामी सण, राजकीय कार्यक्रम आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात १८ ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील कलम ३७ (१), (२) आणि (३) अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी काढलेल्या आदेशानुसार १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा मेळावा, मोर्चा, रॅली किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. परवानगीशिवाय गर्दी केली तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, दगड, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ तसेच इजा करण्यास कारणीभूत ठरतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीचे किंवा संस्थेचे प्रतीकात्मक पुतळे, प्रतिमा जाळणे, आक्षेपार्ह अथवा चिथावणीखोर घोषणा देणे आणि सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या कृतींनाही आळा घालण्यात आला आहे.

पुण्यात सण आले की ढोल-ताशे, मिरवणुका आणि राजकीय कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. त्यातच विविध संघटनांची आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनेही होत असतात. पोलिसांच्या मते, अशा संवेदनशील वातावरणात किरकोळ ठिणगीचे रूपांतर मोठ्या वादात होऊ शकते. त्यामुळे ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन यांसह आगामी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी उत्सव साजरा करावा; पण उत्साहाचा फुगा कायद्याच्या टाचेखाली फुटणार नाही, याची काळजी घ्यावी.

या आदेशात सोशल मीडियालाही लगाम घालण्यात आला आहे. भडकाऊ भाषणे, धमकी देणारे संदेश, भीती निर्माण करणारी सामग्री किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारे व्हिडिओ प्रसारित केल्यास कारवाई होऊ शकते. मात्र कर्तव्यावर असलेल्या अधिकृत शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या शस्त्रबाळगण्याच्या नियमांना अपवाद आहे. तसेच सुरक्षा रक्षक व पहारेकऱ्यांना कर्तव्यावर असताना साडेतीन फुटांपर्यंतची काठी बाळगण्याची मुभा आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत कारवाई होऊ शकते. म्हणजे पुण्यात पुढचे चौदा दिवस एकच मंत्र—उत्सव करा, आंदोलन करा; पण आधी परवानगी घ्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *