महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० सप्टेंबर – मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनची झळ सर्वच उद्योगधंद्यांना मोठय़ा प्रमाणात बसली. मात्र या काळातदेखील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घसघशीत कमाई केली आहे. मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या काळात अंबानी यांनी प्रति तास 90 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्टमधून पुढे आली आहे.
हुरून इंडिया गेल्या 9 वर्षांपासून हिंदुस्थानातील श्रीमंतांची यादी जाहीर करीत आहे. या यादीत सलग नऊ वर्षे मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 6 लाख 58 हजार400 कोटी रुपये इतकी आहे. यातील बहुतांश कमाई त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून केली आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत 73 टक्के वाढ झाली आहे. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून जगभरात ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
लंडनस्थित हिंदुजा बंधू या यादीत दुसऱया क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1लाख 43हजार 700 कोटी रुपये इतकी आहे. तर एचसीएल कंपनीचे शिव नादार तिसऱया क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 1लाख 41हजार 700 कोटी रुपये इतकी आहे.
टॉप 10 मध्ये अवेन्यू सुपर मार्टचे संस्थापक राधकिशन दमानी सातव्या क्रमांकावर आहेत. याशिवाय सिरम इन्स्टिटय़ूटचे सायरस पुनावाला, कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक, सन फार्मा कंपनीचे दिलीप सांघवी, बांधकाम व्यावसायिक सायरस पालनजी मिस्त्री यांचादेखील समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे.