10 टक्के आरक्षणाला स्थगिती देऊ, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची संभाजीराजेंची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० सप्टेंबर – मुंबई -मराठा समाजाला EWS प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची हालचाल सुरू होती. याला मराठा समाजाचा विरोध होता. त्यामुळे हे आरक्षण आम्हाला नको या मागणीसह आज छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. भेटीत संभाजीराजेंची मागणी ऐकून घेतल्या नंतर आपण लवकरच यावर स्थगिती आणू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संभाजी राजेंनी दिली.

याबाबत बोलताना संभाजी राजे म्हणाले की, बैठकीत EWS आरक्षणाबाबत आमची चर्चा झाली आहे. इडब्ल्यूएसच्या 10 टक्क्यांच्या आरक्षणाला सर्व समाजाचा विरोध होता. कारण मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवलं आहे. त्याबाबत कायदा देखील झाला आहे. म्हणून मराठा समाजाला एसईबीसीचं आरक्षण मिळालं परंतु त्यावर स्थिगिती बसली आहे. त्यावर आम्हाला 10 टक्के आरक्षण देतो असं आम्हाला सांगण्यात आलं. परंतु आमच्या माहितीनुसार असं आरक्षण मराठा समाजाला देता येतं नाही. आणि जरी द्यायचं ठरवलं तरी त्याच्या जाचक अटीं मराठा समाजाला मान्य होऊ शकत नाहीत. या मिटिंगला सर्व अधिकारी होते. महाधिवक्ता कुंबकोणी देखील उपस्थित होते. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील होते. त्यांनी मान्य केलं आहे की, आमची चूक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमची बाजू ऐकून घेतल्यानंतर ताबडतोब आदेश काढण्यासाठी सांगितले आहेत.

मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात EWS मध्ये घालणार होते त्याला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. जर आम्हाला 10 टक्के आरक्षणात घातलं तर पुन्हा पिटीशन दाखल होतील आणि आम्हाला अडचण निर्माण होईल. आजच्या बैठकीत मेगा भरतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही परंतु आमची मागणी आहे जोपर्यंत कोर्टात निर्णय होतं नाही तोपर्यत कोणतीही राज्यात भरती घेऊ नये.

यासोबतच राज्यात सुपर न्युमरी पद्धतीने म्हणजेच अलौकिक पद्दतीने 12 टक्के शिक्षणासाठी आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासोबतच पंढरपूरमध्ये शरद पवार यांनी दोन्ही राजेंबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संभाजीराजे म्हणाले की, शरद पवार काय बोलले यावर मी बोलणार नाही. परंतु राज्यसभेत प्रथम या विषयावर बोलणारा खासदार मी आहे. यासोबतच आजपर्यंत मराठा समाजासाठी आंदोलन करणारा खासदार देखील मीच आहे.

ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि हरिभाऊ राठोड यांनी आज घेतलेल्या भेटीबाबत बोलताना राजे म्हणले की, त्यांची मराठा आरक्षणाबाबत कोणतीही नाराजी नाही. आमचा विषय एससीबीसी संदर्भात आहोत. त्यांनी आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच प्रकाश शेंडगे देखील भेटले त्यांनी देखील आमचा कसलाही विरोध नसल्याच म्हटलं आहे. आमचा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून आरक्षण घेण्याचा कोणताही हेतू नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षण प्रश्नी भेटीची वेळ मागितली आहे, परंतु कोरोनामुळे अद्याप वेळ मिळालेली नाही. वेळ मिळाली की आम्ही सर्व खासदारांना घेऊन जाऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *