महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ ऑक्टोबर – पिंपरी चिंचवड -मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याच पार्श्वभूमिवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी वेळोवेळी आपली सामंजस्यपूर्ण भूमिका घेत मराठा समाजाला दिलासा देण्याचे काम केले आहे. याच त्यांच्या कार्याने वेळोवेळी प्रेरीत होऊन नंदादीप प्रतिष्ठानच्या नीता ढमाले यांनी खासदार संभाजी महाराजांचे निवेदनाद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच खासदार संभाजी महाराज केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात जे पाठींब्याचे निवेदन देणार आहात त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करणार्या ढमाले यांनी आपला जाहीर पाठींबा दर्शविला आहे.
खासदार संभाजी महाराज यांना दिलेल्या निवेदनात नीता ढमाले यांनी म्हटले आहेकी, राज्यात 11 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होणार आहेत. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजाकडून 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यासंदर्भात अनेक स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी फोन व मेसेजद्वारे संपर्क साधून या महाराष्ट्र बंदचा परिक्षेवर काही परिणाम होऊ नये, याबद्दल विनंती केली आहे. खासदार संभाजी महाराज मराठा समाजाचे मार्गदर्शक म्हणून त्यांच्या शब्दाला समाजात मान आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांना कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत त्यांनी अधिकारवाणीने आवाहन करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासोबतच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरभरती बाबत जो संभ्रम निर्माण झाला आहे, त्याविषयी शासन स्तरावर योग्य तो समन्वय साधून सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा, अशीही विनंती ढमाले यांच्याकडून या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.