Sugar Rate: साखरेचा गोडवा स्वस्त, गुळाला कडू धक्का

Spread the love

Loading

सरकारी हस्तक्षेपानंतर दर कोसळले; गूळ क्विंटलमागे तब्बल १६०० रुपयांनी घसरला

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट २०२६ ।। श्रावण, गणेशोत्सव आणि सणासुदीची चाहूल लागली की साखरेच्या बाजारात गोडवा कमी आणि दरांचा ताप जास्त दिसतो. गेल्या काही आठवड्यांत साखरेने अक्षरशः उसाचीच किंमत वाढवली होती. किरकोळ बाजारात दर ६५ रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली. पण सरकारने बाजारात हस्तक्षेप करताच दरांचा फुगा फुटू लागला. केंद्राने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली, तर देशांतर्गत बाजारात आणखी सुमारे ३ ते ३.५ लाख टन साखर उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा केला. परिणामी बाजारात पुरवठा वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आणि साखरेच्या दरांवर थेट परिणाम दिसू लागला.

बुधवारपर्यंत काही बाजारांत साखरेचे दर प्रतिकिलो ५२ रुपयांच्या आसपास आल्याचे चित्र दिसत आहे. सरकारी कारवाई, अतिरिक्त पुरवठ्याची शक्यता आणि साठ्यांवरील नियंत्रण यामुळे भाववाढीचा वेग थांबला आहे. साखरेच्या भावात झालेली वाढ ही प्रत्यक्ष टंचाईपेक्षा सट्टेबाजी आणि बाजारातील अंदाजांमुळे अधिक असल्याचा दावा साखर उद्योगातील प्रतिनिधींनी केला होता. देशात सणासुदीच्या मागणीसाठी पुरेसा साठा असल्याचेही सांगण्यात आले होते. आता नव्या साखरेचा पुरवठा आणि ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या गाळप हंगामाच्या अपेक्षेमुळे भाव आणखी नरमण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

साखरेचा दर खाली येताच गुळाच्या बाजारालाही त्याचा फटका बसला. काही दिवसांपूर्वी ७ हजार रुपयांच्या वर गेलेला गूळ अनेक बाजारांत ५४०० ते ५८०० रुपयांच्या पट्ट्यात येऊ लागला असून, काही ठिकाणी क्विंटलमागे सुमारे १६०० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. कोल्हापूर बाजारातही विक्रमी पातळी गाठल्यानंतर गुळाच्या दरांत सुमारे २० टक्क्यांची घसरण झाल्याचे वृत्त आहे. अर्थात, सर्व बाजारांत एकच दर नसून गुणवत्ता, आवक आणि स्थानिक मागणीनुसार मोठा फरक दिसतो. महाराष्ट्रातील विविध मंड्यांमध्ये गुळाचे दर वेगवेगळ्या पातळ्यांवर नोंदले गेले आहेत.

मात्र, ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असली तरी गूळ उत्पादकांच्या चेहऱ्यावर गोडवा उरलेला नाही. बाजाराचा नियमच असा—भाव वाढला की ग्राहक ओरडतो आणि भाव कोसळला की उत्पादक! साठेबाजीच्या संशयावरून तपासण्या, अतिरिक्त साखर बाजारात आणण्याचे निर्णय आणि आयातीची परवानगी यामुळे व्यापाऱ्यांचे गणित बदलले आहे. सरकारने सणासुदीपूर्वी भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी पुढील काही दिवसांत हा दिलासा टिकतो की पुन्हा साखरेच्या पोत्यातून महागाई बाहेर पडते, याकडे सामान्य ग्राहक आणि उत्पादक दोघांचेही लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *