महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ ऑक्टोबर – मुंबई :इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेडने (Biological E. Limited, Hyderabad) एक विशेष असं अँटी-सीरम (Antisera) विकसित केलं आहे.सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत. सध्या कोरोनाव्हायरसवर विविध आजारांवरील औषधांनी उपचार सुरू आहेत. लशींचं ट्रायल सुरू आहे. अशात भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरवरील उपचार शोधण्यात एक मोठं यश मिळालं आहे.
हे अँटी-सीरम कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी फायद्याचं तर ठरेलच शिवाय कोरोनापासूनही बचाव करण्यासाठीही याचा वापर करता येईल.
याआधीदेखील रेबीज, हेपेटायटिस, वॅक्सिनिया व्हायरस, टिटॅनस, डिप्थिरिया यासारख्या अनेक व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत, असं आयसीएमआरने सांगितलं.
कोरोनामुक्त रुग्णांच्या प्लाझ्माचा वापरही असाच केला जातो. मात्र या प्लाझ्मामधील अँटिबॉडीजची पातळी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते. ज्यामुळे त्याचा वापर करताना अडचणी येतात.पण आता विकसित करण्यात आलेलं हे अँटी-सीरम खूप मोठं यश असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे.