![]()
२१ दिवस आधीपासून ३० दिवसांनंतरपर्यंत तपासणी; दूध, खवा, मिठाईपासून भंडारा-लंगरपर्यंत सर्वांवर नजर
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर २०२६ ।। सण आला की बाजारात आनंदापेक्षा मागणी वाढते आणि मागणी वाढली की भेसळखोरांचीही ‘उत्पादन क्षमता’ जागी होते. दूध, खवा, पनीर, तूप, तेल, मिठाई यांची मागणी वाढताच काहींच्या प्रामाणिकपणाला अचानक सुट्टी मिळते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने आता वर्षभरासाठी कायमस्वरूपी ‘Festival Enforcement Calendar’ लागू केला आहे. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र, ईद, ख्रिसमस, दहीहंडी, जन्माष्टमीपासून स्थानिक जत्रा, यात्रा आणि उरुसांपर्यंत स्वतंत्र आदेश काढण्याची पद्धत बाजूला पडणार आहे. प्रत्येक सणासाठी आधीच नियोजन करून अन्नसुरक्षा तपासणी केली जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिल्या अशा प्रकारच्या सर्वसमावेशक व्यवस्थेच्या रूपात मांडण्यात आला आहे.
या नव्या व्यवस्थेची खरी धार त्याच्या कालावधीत आहे. एखादा सण सुरू झाला की दोन दिवस धाडी टाकून फोटो काढायचे आणि नंतर फाइल कपाटात ठेवायची, अशी जुनी पद्धत आता बदलण्याचा दावा FDAने केला आहे. सणाच्या तब्बल २१ दिवस आधीपासून कारवाई सुरू होईल आणि सण संपल्यानंतर ३० दिवसांपर्यंत ती सुरू राहणार आहे. मोहीम चार टप्प्यांत राबवली जाणार असून सुरुवातीला हाय-रिस्क अन्नपदार्थांचे मॅपिंग, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना दिली जाणार आहे. त्यानंतर उत्पादन केंद्रे, गिरण्या, खवा गोदामे आणि पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. म्हणजे भेसळखोराने दुकानात माल आणण्याआधीच प्रशासन त्याचा माग काढण्याच्या तयारीत आहे.
FDAने तब्बल ११ उच्च-जोखीम अन्नश्रेणी निश्चित केल्या आहेत. उपवासाचे पदार्थ, दूध-दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी-बर्फ, मिठाई व खाद्यरंग, खाद्यतेल, फळे, सुका मेवा-बेसन, बेकरी पदार्थ, ई-कॉमर्समधील खाद्यपदार्थ आणि आयात अन्न यांची विशेष तपासणी केली जाणार आहे. त्यात खाद्यतेलाचा पुनर्वापर, कच्च्या मालाचा स्रोत आणि उत्पादनाची सुरक्षितता यावरही लक्ष असेल. सामूहिक अन्नवाटप करणाऱ्या आयोजकांचीही सुटका नाही. महाप्रसाद, इफ्तार, अन्नछत्र, लंगर आणि भंडारा आयोजित करणाऱ्यांना किमान सात दिवस आधी FDAला माहिती द्यावी लागेल. आयोजक, केटरर, मेनू, पाण्याचा स्रोत, लाभार्थ्यांची संख्या आणि कच्च्या मालाची माहिती देणे अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली नियम कागदावर राहिले, तर भेसळखोर पुन्हा जिंकतील; म्हणून अंमलबजावणीच खरी कसोटी आहे.
या मोहिमेमागचा उद्देश साधा आहे—सणाचा प्रसाद नागरिकांच्या आरोग्याचा ‘प्रसाद’ बनू नये. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्नसुरक्षा कारवाईला वेग देण्यात आला असून, उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाई जलद करण्याची यंत्रणाही आखण्यात आली आहे. मात्र आदेश काढणे सोपे आणि त्याची अंमलबजावणी करणे कठीण. महाराष्ट्रात हजारो दुकाने, लाखो ग्राहक आणि असंख्य धार्मिक-सामाजिक कार्यक्रम असताना प्रत्येक ठिकाणी नजर ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता भेसळखोरांना ‘सण आला, धंदा वाढला’ अशी गणिते मांडण्याआधी दोनदा विचार करावा लागेल. कारण यापुढे सण संपेपर्यंतच नाही, तर सणाच्या आधीपासून नंतरपर्यंत FDAचा कॅलेंडर त्यांच्या मागावर असणार आहे.
