![]()
वाढत्या गर्दीने प्रशासनाची झोप उडवली; तीन डब्यांची मेट्रो अपुरी, महामेट्रोकडून मोठ्या विस्ताराची तयारी
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ सप्टेंबर २०२६ ।। पुणेकरांनी मेट्रोला अक्षरशः डोक्यावर घेतले आणि आता त्या प्रेमाचाच भार मेट्रोच्या डब्यांवर पडू लागला आहे! काही वर्षांपूर्वी रस्त्यावरील वाहतूक कोंडीला कंटाळलेला प्रवासी मेट्रोकडे वळला; पण आता गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तीन डब्यांची मेट्रो पुरेशी नाही, हे अखेर प्रशासनालाही उमगले असून भविष्यात सहा डब्यांच्या गाड्या चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. महामेट्रोकडून यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून तो राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. राज्याने हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रस्ताव केंद्राकडे जाणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा मेट्रोला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी कार्यालयात जाण्याची वेळ आणि सायंकाळी परतीची वेळ म्हणजे मेट्रोच्या डब्यांत ‘आरामदायी प्रवास’ हा शब्द शोधावा लागेल, अशी अवस्था! सध्या तीन डब्यांच्या गाड्या धावत असल्या तरी प्रवाशांची वाढती संख्या पाहता क्षमता वाढवणे अपरिहार्य झाले आहे. गणेशोत्सव, दहीहंडी आणि इतर मोठ्या कार्यक्रमांच्या काळात तर मेट्रो स्थानके आणि डबे गर्दीने फुलून जातात. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान प्रवासीसंख्येत मोठे चढ-उतार दिसले असून ऑगस्टमध्ये तब्बल ७४ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केल्याचे आकडे सांगतात. म्हणजे मेट्रो ही आता केवळ पर्याय राहिलेली नसून शहराच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार बनली आहे.
मात्र, डबे वाढवणे म्हणजे रेल्वेच्या खेळण्यात आणखी एक डबा जोडण्याइतके सोपे नाही. नवीन कोच खरेदी, देखभाल व्यवस्था, सिग्नल प्रणाली आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मंजुरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महामेट्रोने तयार केलेल्या डीपीआरमध्ये भविष्यातील प्रवासीसंख्या आणि आवश्यक क्षमतेचा विचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या स्थानकांचे प्लॅटफॉर्म सहा डब्यांची मेट्रो उभी राहील, इतके सक्षम असल्याने विस्तारासाठी मोठा अडथळा नसल्याची बाब प्रवाशांसाठी दिलासादायक आहे.
प्रश्न आता एवढाच—प्रवासी वाढल्यानंतर डबे वाढवायचे की गर्दी असह्य झाल्यावर? पुण्याच्या वाहतुकीची अवस्था पाहता निर्णयाची गतीही मेट्रोसारखीच असणे आवश्यक आहे. आज तीन डब्यांत प्रवाशांची कोंडी होत असेल, तर उद्या प्रवासी वाढल्यावर परिस्थिती अधिक बिकट होणार, हे सांगण्यासाठी कोणत्याही डीपीआरची गरज नाही. सहा डब्यांची मेट्रो सुरू झाली तर हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्रयत्नांनाही हातभार लागेल. पण तोपर्यंत पुणेकरांनी गर्दीतूनच मेट्रोचा प्रवास सुरू ठेवायचा आणि मंजुरीच्या फाइलने वेग पकडण्याची वाट पाहायची—हीच खरी परीक्षा!
