पुणेकरांनो सावधान ! तीन मार्गांवर वाहतुकीचा नवा फॉर्म्युला

Spread the love

Loading

भूमकर चौकात एकेरी मार्ग, दत्तवाडीत पार्किंग बदल; मुंढव्यात ‘राईट टर्न’ला ब्रेक

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ सप्टेंबर २०२६ ।। पुण्यात वाहतूक कोंडी ही आता फक्त समस्या राहिलेली नाही, तर रोजच्या आयुष्यातील एक ‘नियोजित कार्यक्रम’ बनली आहे. घरातून वेळेवर निघायचं, रस्त्यावर यायचं आणि मग पुढच्या सिग्नलवर आपलं आयुष्य शांतपणे विचारात घ्यायचं—हा पुणेकरांचा अनुभव! अशा परिस्थितीत शहर वाहतूक पोलिसांनी सिंहगड, दत्तवाडी आणि मुंढवा वाहतूक विभागांतर्गत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. वाहतूक अधिक सुरळीत करणे आणि कोंडी कमी करणे हा या बदलांचा उद्देश असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी या प्रस्तावित बदलांबाबत सूचना किंवा हरकती असल्यास २१ सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात वाहतूक शाखेकडे मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंहगड वाहतूक विभागातील भूमकर चौक परिसरात सर्वात महत्त्वाचा बदल होणार आहे. भूमकर चौकातून सर्व्हिस रोडने स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या आणि मंदिराकडून भूमकर चौकाकडे येणाऱ्या वाहनांच्या मार्गाचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड एकेरी करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच मंदिरासमोरील सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या पुलावर भूमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाच प्रवेश देण्याचे नियोजन आहे. उलट दिशेने येणाऱ्या वाहनांना या पुलावर प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मंदिराकडून भूमकर चौकाकडे जाणाऱ्यांनी डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड वापरावा लागेल. रस्ता तोच, पण दिशा बदलली की पुणेकरांचा जीपीएसही दोनदा विचार करेल, एवढं मात्र नक्की!

दत्तवाडी विभागात पार्किंग व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. सदाशिव पेठ परिसरातील एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलसमोरील रस्त्यावर सुमारे ५० मीटरच्या अंतरात पी-१ आणि पी-२ पार्किंगची व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला बेफिकीरपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारी कोंडी कमी करण्यासाठी हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो. दुसरीकडे, मुंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत आर्मी गेट आणि मेरिट सूट परिसरातील राईट टर्न बंद करण्याचा प्रस्ताव आहे. उजवीकडे वळणाऱ्या वाहनांमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक थांबते आणि मग एका गाडीमागे दुसरी, दुसऱ्यामागे तिसरी अशी रांग वाढत जाते. त्या साखळीला ब्रेक लावण्याचा हा प्रयत्न आहे.

पुण्यात वाहतुकीत बदल करणे म्हणजे फक्त फलक बदलणे नव्हे; तर नागरिकांच्या रोजच्या प्रवासाची गणिते बदलणे होय. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती, पुरेसे दिशादर्शक फलक आणि सुरुवातीच्या काळात वाहतूक पोलिसांची प्रभावी व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा कोंडी कमी करण्यासाठी केलेला बदलच नव्या कोंडीचे कारण ठरू शकतो. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी या बदलांची माहिती दिली असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. पुणेकरांनीही बदल लागू झाल्यानंतर ‘मला माहितीच नव्हतं’ म्हणण्यापेक्षा आधीच पर्यायी मार्ग समजून घेणे फायद्याचे ठरेल. कारण पुण्याच्या रस्त्यावर वेळ वाचवायचा असेल, तर कधी कधी गाडीपेक्षा माहितीच जास्त वेगाने धावते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *