महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ ऑक्टोबर – मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणामुळं महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इतकंच नव्हे तर, सदर प्रकरणी संपूर्ण देशातून हाथरसप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. ज्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही संतप्त प्रतिक्रिया देत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मनसेच्या सरचिटणीसपदी असणाऱ्या शालिनी ठाकरे, यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक लक्षवेधी पोस्ट लिहित पीडितेवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येक नराधमाला सात दिवसांच्या आत दिल्लीतील ‘इंडिया गेट’ या वास्तूसमोरील चौकात फाशी द्या अशी स्पष्ट मागणी केली आहे.
इतकंच नव्हे, तर महिलांच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या या नराधमांच्या लटकत्या मृतदेहांना दगड मारण्याची परवानगी महिलांना द्या जेणेकरुन कोणत्याही जात- धर्मापेक्षा या देशातील कायदा हा महिलांच्या इज्जतीला जास्त महत्त्व देतो हे सर्व प्रकारच्या विकृत पुरुषांना कळू दे, असा संतप्त सूर त्यांनी आळवला.