![]()
गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी फेऱ्या; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर २०२६ ।। गणेशोत्सव म्हटला की पुण्याच्या रस्त्यांवर गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा बोजवारा हे जणू ठरलेलेच. यंदा मात्र भाविकांच्या या कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे मेट्रोने मोठा पल्ला गाठला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्या दर पाच मिनिटांनी होणार आहेत. पुणे मेट्रोच्या अधिकृत माहितीनुसार, १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान सेवा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत राहील.
पण खरी कसोटी गणेशोत्सवाच्या मुख्य दिवसांत आहे. १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रो सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार आहे. म्हणजे मंडळांचे दर्शन, आरती आणि रात्रीची गर्दी आटोपून परतणाऱ्या भाविकांना रस्त्यावर वाहन शोधण्याची किंवा वाहतूक कोंडीत तासन्तास अडकण्याची वेळ कमी होऊ शकते. त्यानंतर २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ६ वाजता सुरू झालेली सेवा थेट २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे तब्बल ४१ तास अखंड मेट्रो सेवा उपलब्ध असेल. २७ सप्टेंबरपासून पुन्हा सकाळी ६ ते रात्री ११ अशी नियमित सेवा सुरू होईल.
मात्र सुविधा वाढवली म्हणून गर्दीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संपत नाही. म्हणूनच महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाबाबत पुणे मेट्रोने विशेष सूचना दिल्या आहेत. गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंडई स्थानकात उतरण्याऐवजी शक्यतो ते परतीच्या प्रवासासाठी वापरावे. मार्गिका १ वरील प्रवाशांनी कसबा पेठ, तर मार्गिका २ वरून वनाजच्या दिशेने येणाऱ्यांनी डेक्कन जिमखाना आणि रामवाडीच्या बाजूने येणाऱ्यांनी PMC स्थानकाचा वापर करावा. मंडई स्थानकावर १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान एकदिशात्मक व्यवस्था राहणार असून लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील गेट क्रमांक ३ प्रवेशासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील गेट क्रमांक २ बाहेर पडण्यासाठी असेल.
याशिवाय मध्यवर्ती पुण्यात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर इंटरचेंज टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. त्याऐवजी कसबा पेठ, PMC किंवा छत्रपती संभाजी उद्यान या स्थानकांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण गणेशोत्सवात भक्तीचा उत्साह जितका मोठा, तितकी गर्दीही मोठी असते; आणि गर्दीला शिस्त नसेल तर सुविधा देखील डोकेदुखी ठरते. त्यामुळे मेट्रोने फेऱ्या वाढवणे हा चांगला निर्णय असला, तरी प्रवाशांनीही नियम पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. यंदा रस्त्यांवरील कोंडीला पर्याय देण्याची जबाबदारी मेट्रोने घेतली आहे; आता पुणेकरांनी त्याचा शहाणपणाने वापर करायचा आहे.
