दिवाळीपर्यंत FMCG दरवाढीला ब्रेक

Spread the love

Loading

वाढत्या कच्च्या मालाच्या खर्चाचा भार कंपन्याच उचलणार; ग्राहकांची मागणी आणि विक्री वाढविण्यावर भर

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर २०२६ ।। दिवाळीच्या तोंडावर घरखर्चाचा ताळेबंद मांडणाऱ्या सर्वसामान्यांसाठी FMCG क्षेत्रातून काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यपदार्थ, साबण, शाम्पू, टूथपेस्ट, बिस्किटे, चहा-कॉफी आणि इतर रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीत दिवाळीपर्यंत मोठी वाढ टाळण्याचा कंपन्यांचा कल आहे. वाढत्या कच्च्या मालाच्या किमती आणि भूराजकीय तणावाचा उत्पादन खर्चावर दबाव असतानाही ग्राहकांची मागणी खंडित होऊ नये, यासाठी कंपन्या दर स्थिर ठेवण्याला प्राधान्य देत आहेत.

मात्र ही ग्राहकांवरील महागाई कायमची थांबली, असा अर्थ काढणे घाईचे ठरेल. उद्योगातील कंपन्यांनी यापूर्वीच काही उत्पादनांच्या किमतीत साधारण २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. खाद्यतेल, साखर, कॉफी, कोको आणि पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे कंपन्यांच्या नफ्यावर दबाव आहे. त्यामुळे सध्या दरवाढ रोखली असली तरी खर्चाचा ताण कायम राहिल्यास पुढील तिमाहीत किंमतींचा फेरविचार होऊ शकतो.

याबाबत ITCचे Foods Divisionचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक Hemant Malik यांनी सणासुदीच्या काळात किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. तर Parle Productsचे मुख्य विपणन अधिकारी Mayank Shah यांच्या मते, किमान दिवाळीपर्यंत मोठी दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे. शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेतील मागणी मजबूत असल्याने कंपन्या किंमत वाढविण्यापेक्षा विक्रीचे प्रमाण वाढविण्यावर भर देत आहेत.

Dabur Indiaचे CFO Ankush Jain यांनी काही उत्पादनांच्या किमतीत निवडक बदल केल्याचे सांगितले असून, पुढील निर्णय बाजारातील परिस्थिती पाहून घेतले जातील. म्हणजेच ग्राहकाला मिळणारा दिलासा हा सध्या निश्चित कालावधीपुरता आहे. कंपन्या खर्चकपात, उत्पादन व्यवस्थापन आणि कार्यक्षमता वाढवून वाढत्या खर्चाचा काही भार स्वतः सहन करीत आहेत.

गेल्या वर्षीच्या GST दरकपातीमुळे अनेक FMCG उत्पादनांच्या मागणीला चालना मिळाली होती. यंदाही सणासुदीच्या खरेदीचा वेग कायम ठेवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत साबणापासून बिस्किटांपर्यंत अनेक वस्तूंचे दर स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी त्यानंतरचा निर्णय कच्चा माल, जागतिक बाजार आणि मागणीच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *