लोहगडवर केतनला उभे करून फोटो काढले

Spread the love

Loading

आरोपपत्रातील दावा; १,८०१ चॅट्सचा तपास, डिलीट केलेले ११ व्हॉट्सॲप संदेशही फॉरेन्सिकमधून मिळाले

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर २०२६ ।। पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने ५,०५३ पानी आरोपपत्रामुळे पुन्हा गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरून पडून झालेला अपघाती मृत्यू मानला गेलेला हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. तपासातील नव्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी सिया आणि केतन लोहगडवर गेले होते. ज्या ठिकाणाहून १८ जून रोजी केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे, त्याच ठिकाणी सियाने केतनला उभे केले. केतन समोरील धरणाचे पाणी आणि निसर्ग पाहत असताना त्याचे मागून वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढण्यात आले. पोलिसांच्या मते, या छायाचित्रांचा पुढील कथित नियोजनाशी संबंध होता.

प्रकरणाचा तपास केवळ घटनास्थळापुरता थांबलेला नाही. आरोपपत्रानुसार १४ जूनलाही सिया आणि केतन लोहगडवर गेले होते आणि त्या वेळी केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर १८ जूनला केतनचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे गोळा केले आहेत. आरोपींच्या मोबाईलमधील तब्बल १ हजार ८०१ चॅट्सचा डेटा तपासण्यात आला असून, त्यातील डिलीट केलेले ११ व्हॉट्सॲप संदेश फॉरेन्सिक तपासातून पुन्हा मिळवण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. मोबाईल डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, छायाचित्रे आणि तांत्रिक विश्लेषण अहवालही आरोपपत्राचा भाग आहेत.

डिजिटल तपासाची व्याप्तीही मोठी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार रिसेंडवरील ४१०, व्हॉट्सॲप ३६७, नेटिव्ह मेसेज २६२, इन्स्टाग्राम २४८, नॉलेजसी १५१, बायोमी १३५, स्नॅपचॅट १२८, चॅटजीपीटी ८१ आणि फेसबुकवरील १९ संभाषणे किंवा सर्च डेटाचा तपास करण्यात आला. या सर्व पुराव्यांच्या आधारे सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, आरोपपत्रातील दावे हे तपास यंत्रणेची बाजू आहेत; आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. त्यामुळे या डिजिटल पुराव्यांचे अंतिम कायदेशीर मूल्यमापन न्यायालयातच होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *