पावसामुळे कांद्यावर निर्यातबंदी लादली, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ ऑक्टोबर – मुंबई – हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात पावसाची दाट शक्यता आहे. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा खराब होण्याची शक्यता असून त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याच्या भीतीने आम्ही आधीच निर्यात बंद केली, असा अजब खुलासा केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी रविवारी केला. तसेच निर्यातबंदीमुळे देशातील कांद्याच्या भावावर काही एक परिणाम झालेला नाही”, असा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, “नव्या कृषी कायद्यामुळे वर्षानुवर्षे जोखडात अडकलेल्या भारतातील शेतकऱ्यांना आम्ही मुक्त केले आहे. या कायद्यामुळे येणाऱ्या वर्षात त्यांची प्रचंड प्रगती होईल, आता शेतकरी आपला माल भारतातल्या कोणत्याही बाजारपेठेत जाऊन विकू शकतात. मात्र विरोधक आपला राजकीय फायदा साधण्यासाठी या कायद्याच्या विरोधात गैरसमज निर्माण करत आहेत,’ असे ते म्हणाले.

‘सर्वात पहिली किसान स्पेशल रेल्वे आम्ही सुरू केली, ती देखील महाराष्ट्रतील देवळाली येथून. सुरुवातीला तिला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, त्यानंतर सर्व रेल्वे भरून जात आहेत. नागपूरला आता संत्र्याचा हंगाम सुरू होईल, त्यामुळे येथून किसान रेल चालवा, अशी नितीन गडकरी यांनी मागणी केली आहे. आम्ही त्याचे नियोजन करत आहोत”, असे गोयल यांनी सांगितले. मुंबईतील उपनगरीय लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचे गोयल यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *