आयडब्ल्यूसी पिंपरीच्या लोगोचे दिमाखात अनावरण

Spread the love

Loading

कोकणे चौकात क्लब ब्रँडिंग सोहळा; अध्यक्ष वैशाली जैन यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पिंपरी : समाजसेवेचा ध्यास, महिलांच्या सक्षमीकरणाची बांधिलकी आणि सामाजिक कार्याची गौरवशाली परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने आयडब्ल्यूसी पिंपरी (IWC Pimpri) या इनरव्हील क्लबच्या वतीने १० ऑक्टोबर २०२६ रोजी कोकणे चौक येथे क्लब ब्रँडिंग आणि लोगो अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. क्लबच्या ३० वर्षांच्या प्रवासातील हा सोहळा अभिमानाचा आणि महत्त्वाचा टप्पा ठरला. डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. दीपशिखा पाठक यांच्या शुभहस्ते क्लबच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या वेळी कॉर्पोरेट प्रतिनिधी अनिताजी आणि कुंदाताई भिसे यांची विशेष उपस्थिती लाभली. क्लबची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी आणि समाजसेवेच्या उपक्रमांना नवी दिशा देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

क्लबचा लोगो कोकणे चौकात स्थापित करून आयडब्ल्यूसी पिंपरीने आपल्या कार्याची सार्वजनिक ओळख अधिक ठळक केली आहे. लोगो मिळवणे आणि त्यासाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल क्लबच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. इनरव्हील ही महिलांच्या मैत्री, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी कार्याला प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. १९२४ मध्ये मार्गरेटा यांच्या पुढाकारातून तिची स्थापना झाली. या संस्थेच्या मूल्यांनुसार समाजातील गरजू घटकांसाठी कार्य करणे, महिलांना सक्षम बनवणे आणि सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक योगदान देणे, हा क्लबच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.

आयडब्ल्यूसी पिंपरी क्लबने यंदा ३० वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून, या विशेष वर्षात वैशाली जैन या क्लबच्या ३० व्या अध्यक्ष म्हणून नेतृत्व करत आहेत. त्यामुळे क्लबच्या इतिहासात या वर्षाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोकणे चौकातील लोगो हे केवळ क्लबचे नाव दर्शवणारे चिन्ह नसून, समाजसेवेच्या सातत्यपूर्ण प्रवासाचे प्रतीक ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि सेवाभावी कार्याच्या माध्यमातून समाजाशी अधिक दृढ नाते निर्माण करण्याचा संकल्प क्लबने व्यक्त केला. तीन दशकांच्या अनुभवाच्या बळावर आयडब्ल्यूसी पिंपरी सामाजिक कार्याचा विस्तार करेल आणि महिलांच्या नेतृत्वाला नवी प्रेरणा देईल, असा विश्वास अध्यक्ष वैशाली जैन यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *