Ravet Firecracker Fire: रॉकेटच्या ठिणगीने रावेतमध्ये आग

Spread the love

Loading

आदर्शनगरच्या मैदानातील सुक्या गवताने घेतला पेट; सुनील फरांदे यांच्या नेतृत्वाखाली १० ते १२ जवानांची धाव, वेळीच नियंत्रण मिळाल्याने अनर्थ टळला.

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। मुकाई चौक येथील आदर्शनगर परिसरातील मोकळ्या मैदानात दिवाळीच्या फटाक्याचे रॉकेट सुक्या गवतावर पडताच आग भडकली. कोरड्या गवताने क्षणार्धात पेट घेतल्याने आगीचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सब ऑफिसर सुनील फरांदे यांच्या नेतृत्वाखाली १० ते १२ जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जवानांच्या प्रसंगावधानामुळे आग आसपासच्या परिसरात पसरण्याचा धोका टळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दिवाळीचा आनंद साजरा करताना दुसऱ्यांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होत असेल, तर त्या आतषबाजीला उत्सव म्हणायचे की निष्काळजीपणाचा उन्माद, असा प्रश्न उपस्थित होतो. रॉकेट आकाशात सोडले जाते; पण ते कुठे जाऊन पडेल, याची जबाबदारी कोण घेणार?

ही घटना केवळ रावेतपुरती मर्यादित नाही. पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत आगीच्या तब्बल ७६ घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी ५० घटना मोकळ्या जागांतील गवत, कचरा आणि झाडांना लागलेल्या आगीच्या होत्या; २० ठिकाणी घरे, सदनिका आणि दुकानांना आग लागली, तर सहा घटनांमध्ये वाहनांसह इतर मालमत्तेचे नुकसान झाले. मागील वर्षी लक्ष्मीपूजनाला अशा सुमारे २० घटना नोंदल्या गेल्या होत्या. यंदा दहा अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त १२ संवेदनशील ठिकाणी वाहने तैनात करण्यात आली होती. एकूण ४२ वाहने आणि २५० अधिकारी-कर्मचारी सज्ज होते. एवढी यंत्रणा रस्त्यावर उतरवावी लागणे, ही उत्सवाच्या नियोजनातील गंभीर धोक्याची घंटा आहे.

रावेतमधील आगीने पुन्हा एकदा उघड केले की, मोकळ्या मैदानांतील सुकलेले गवत, कचरा आणि झाडाझुडपांची वेळेवर सफाई न झाल्यास छोटी ठिणगीही मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. नागरिकांनी रॉकेट आणि हवेत उडणारे फटाके मैदानात, इमारतींजवळ, वाहनतळात किंवा कोरड्या गवताच्या आसपास फोडणे टाळले पाहिजे. फटाके फोडताना पाणी किंवा वाळू जवळ ठेवावी आणि आग दिसताच स्वतःचा जीव धोक्यात न घालता अग्निशमन दलाला त्वरित कळवावे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही ज्वलनशील वस्तू साठवू नयेत आणि आग लागल्यास तातडीने अग्निशमन दलाला कळवावे, असे निर्देश दिले आहेत.

फटाक्यांचा आवाज काही क्षणांत विरतो; पण आगीने होणारे नुकसान आयुष्यभराची जखम देऊ शकते. त्यामुळे उत्सव साजरा करा, पण विवेकाला आग लावू नका!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *