कुशनर-विटकॉफ आज मॉस्कोत; चर्चेनंतर डब्लिनमध्ये झेलेन्स्की यांना माहिती देणार, मात्र युद्धसमाप्तीचा करार अद्याप दूरच
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुन्हा एकदा राजनैतिक डाव टाकला आहे. त्यासाठी जावई जेरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना १२ नोव्हेंबरला मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात येत आहे. अबू धाबीमध्ये १० आणि ११ नोव्हेंबर रोजी अमेरिका, रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये दोन दिवस चर्चा झाली. फेब्रुवारीनंतर प्रथमच तिन्ही देशांचे प्रतिनिधी एकाच त्रिपक्षीय चर्चेत सहभागी झाले. मात्र, या बैठकीत युद्ध संपवण्याचा ठोस करार झाला नाही. चर्चा कठीण आणि मतभेद कायम असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘पुढील ४८ तासांत युद्ध संपणार’ अशा आशावादी दाव्यांना सध्या तरी राजनैतिक वास्तवाचा आधार नाही.
कुशनर यांनी चर्चेनंतर काही मुद्द्यांवर “संधी आणि सकारात्मक शक्यता” दिसत असल्याचे सांगितले. युद्धकैद्यांची मोठी अदलाबदल आणि मानवतावादी मदत याबाबत पुढे जाण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र कैद्यांची अंतिम संख्या आणि अंमलबजावणीचे तपशील निश्चित झालेले नाहीत. मॉस्कोमध्ये पुतिन यांच्याशी चर्चा करून याच मुद्द्यांवर प्रगती साधण्याचा अमेरिकी दूतांचा प्रयत्न असेल. याशिवाय पुढील चर्चेत युरोपीय देशांचाही सहभाग वाढवण्याचा प्रस्ताव अमेरिका मांडणार आहे. मात्र, युरोपला चर्चेच्या केंद्रस्थानी स्थान देण्याबाबत रशियाची भूमिका अनुकूल नसल्याचे वृत्त आहे. युद्धकैद्यांची सुटका हा दिलासा असला, तरी भूभागाचा तिढा, युक्रेनची सुरक्षा आणि युद्धोत्तर व्यवस्था हे प्रश्न अजूनही आ वासून उभे आहेत.
मॉस्को दौऱ्यानंतर कुशनर आणि विटकॉफ आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील आणि पुढील प्रस्ताव ते झेलेन्स्की यांच्यासमोर मांडतील. झेलेन्स्की यांनीही वर्षअखेरीस शांततेच्या दिशेने संधी निर्माण होऊ शकते, अशी आशा व्यक्त केली आहे. पण आशेचे शब्द म्हणजे शांततेचा करार नव्हे! एका बाजूला चर्चा सुरू असताना दुसरीकडे हल्ले आणि जीवितहानी थांबलेली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या दूतांचा हा दौरा महत्त्वाचा असला, तरी त्यातून युद्ध संपेलच, असे सांगणे घाईचे ठरेल. पुतिन आणि झेलेन्स्की यांची भूमिका जवळ येते का, यावरच पुढील राजनैतिक घडामोडींचे यश अवलंबून आहे.