बेळगावच्या प्रशिक्षण विमानाच्या अपघातात इंजिन देखभालीतील गंभीर त्रुटी प्रमुख; ई-१२ इंधनाचा वापर पूरक कारण, रेडबर्ड अकादमीच्या व्यवस्थेवरही ताशेरे
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। बेळगाव विमानतळाजवळ ३० मे २०२३ रोजी झालेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या अपघाताचा तपास अखेर विमान सुरक्षेच्या व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड करणारा ठरला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) तपास अहवालानुसार, रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या (RFTA) ‘टेकनाम पी-२००८ जेसी’ विमानाच्या इंजिन देखभालीत झालेली चूक हा अपघाताचा संभाव्य प्रमुख कारणीभूत घटक होता; तर निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल असलेले इंधन हा पूरक घटक ठरला. २४ वर्षीय प्रशिक्षणार्थी वैमानिक चौथ्या एकल प्रशिक्षण फेरीसाठी उड्डाण करत असताना इंजिनमध्ये तीव्र कंपन सुरू झाले. जळल्यासारखा वास, इंजिनच्या वेगातील चढ-उतार आणि अपुरा जोर यामुळे विमानाची उंची कमी होऊ लागली. प्रोपेलर फिरणे बंद झाल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत जवळच्या शेतात आपत्कालीन उतराई केली. विमानाचे मोठे नुकसान झाले; मात्र वैमानिकाला दुखापत झाली नाही.
तपासात इंजिन बसवताना ऑईल सिस्टिममधील हवा आणि अवशेष बाहेर काढण्याची ‘पर्जिंग’ प्रक्रिया योग्यरीत्या न झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातून इनटेक व्हॉल्व्हचा रिटेनर निकामी झाला आणि व्हॉल्व्ह ज्वलन कक्षात पडल्याने इंजिनचे गंभीर नुकसान झाले. म्हणजे आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्येच देखभालीच्या चुकीने मृत्यूचा सापळा तयार झाला होता! इंधनाच्या प्रयोगशाळा तपासणीत १२ टक्के इथेनॉल असलेले ई-१२ इंधन आढळले; अनुमत मर्यादा १० टक्के ई-१० होती. त्यामुळे अनधिकृत इंधनाचा वापर अपघातातील पूरक कारण ठरल्याचे अहवालात नमूद आहे. हा तपशील केवळ इंधनाचा प्रश्न नसून विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाच्या मानकांची काटेकोर तपासणी किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देतो.
अपघातानंतर डीजीसीएने बेळगाव येथील रेडबर्ड अकादमीच्या केंद्राची तपासणी केली. त्यात देखभाल प्रक्रियेतील त्रुटी, सुट्या भागांच्या साठ्याचे सदोष व्यवस्थापन, कूलंट हाताळणीतील कमतरता, कमकुवत अंतर्गत देखरेख आणि अपुरे तांत्रिक मनुष्यबळ आढळले. यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये बारामती येथे रेडबर्डच्या दोन विमानांना अपघात झाल्यानंतर डीजीसीएने अकादमीचे उड्डाण प्रशिक्षणही स्थगित केले होते. त्या वेळी विविध केंद्रांवरील देखभाल व्यवस्थेचे विशेष परीक्षण करण्यात आले होते.
प्रशिक्षणार्थी वैमानिकांना आकाशात धाडण्यापूर्वी जमिनीवरील देखभाल व्यवस्था निर्दोष असणे ही प्राथमिक अट आहे. विमान उडवण्याचे धाडस वैमानिक दाखवतो; पण त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अकादमी आणि नियामक यंत्रणेची असते. ती जबाबदारी कागदोपत्री तपासण्याऐवजी प्रत्यक्षात पार पाडली गेली पाहिजे.
