Pune Tourism: पाचशे रुपयांत पर्यटनाची मेजवानी!

Spread the love

Loading

पीएमपीएमएलच्या १५ मार्गांवर वातानुकूलित ई-बस; सिंहगड, जेजुरी, देहू, आळंदी, लोणावळ्यासह धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांची सफर, प्रत्येक बससोबत मार्गदर्शक

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पर्यटन करायचे म्हटले की खिशाला कात्री आणि खासगी वाहनांचा खर्च, असे समीकरण आता बदलण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) अवघ्या ५०० रुपयांत वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्यासाठी १५ विशेष मार्गांवर ही सेवा सुरू आहे. सिंहगड किल्ल्याचा पायथा, खडकवासला धरण, पानशेत, मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूचे गाथा मंदिर, आळंदी, भाटघर धरण, कार्ला लेणी आणि लोणावळ्यातील महालक्ष्मी नारायणी धाम अशा ठिकाणांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक बसमध्ये मार्गदर्शकाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे केवळ प्रवास नव्हे, तर त्या स्थळांचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्वही जाणून घेता येणार आहे.

शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या बस धावणार आहेत. प्रवाशांना डेक्कन जिमखाना, पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या आठ अधिकृत पास केंद्रांवर तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. विशेष म्हणजे, पर्यटनासाठी घेतलेल्या तिकिटावर निर्धारित ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी पीएमपीएमएलच्या नियमित बससेवेचाही लाभ घेता येणार आहे. एखाद्या अपरिहार्य कारणामुळे किंवा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पर्यटन बस रद्द झाली, तर पुढील शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रवासाची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ३३ प्रवाशांचा गट एकत्रितपणे संपूर्ण बस आरक्षित करू शकतो. अशा आरक्षणावर पाच प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीइतकी सवलत देण्यात येणार आहे. मागणीनुसार इतर दिवशीही गटांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून दिली जाऊ शकते. कुटुंबीय, मित्रमंडळी, शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते. अधिक माहिती आणि आरक्षणासाठी नागरिकांनी ०२०-२४५०३२३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. मात्र, केवळ योजना जाहीर करून भागणार नाही; बस वेळेवर सुटणे, स्वच्छता, सुरक्षितता आणि नियोजित स्थळांना प्रत्यक्ष भेट मिळणे याची जबाबदारीही पीएमपीएमएलने पार पाडली पाहिजे. कारण पाचशे रुपयांत पर्यटनाची मेजवानी देताना प्रवाशांना गैरसोयींचा प्रसाद मिळता कामा नये!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *