RAC व्यवस्थेला अखेरचा लाल सिग्नल?

Spread the love

Loading

पूर्ण बर्थ नाही, तरी पूर्ण भाडे! प्रवाशांच्या गैरसोयीवर रेल्वे प्रशासनाकडून पुनर्विचार; मात्र सुविधा बंद करण्याचा अंतिम निर्णय अद्याप नाही.

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। रेल्वेचा प्रवास स्वस्त, सुलभ आणि आरामदायी असल्याचा दावा केला जातो; पण प्रत्यक्षात लांब पल्ल्याच्या प्रवासात RAC तिकीट मिळालेल्या प्रवाशांच्या वाट्याला अर्धवट सोय आणि पूर्ण भाड्याचा भुर्दंड येतो. याच व्यवस्थेला आता रेल्वे प्रशासनाने प्रश्नांकित केले आहे. Reservation Against Cancellation अर्थात RAC सुविधा बंद करण्याच्या शक्यतेचा भारतीय रेल्वे विचार करीत असल्याचे वृत्त १३ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले. मात्र, प्रवाशांनी लगेच आनंदाने उड्या मारू नयेत; कारण अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत आदेश जारी झालेला नाही. सध्याच्या व्यवस्थेत दोन RAC प्रवाशांना साधारणपणे एक साइड लोअर बर्थ बसण्यासाठी दिली जाते. दिवसा दोघांना बसण्याची जागा मिळते; रात्री मात्र स्वतंत्र झोपण्याची बर्थ मिळेलच याची खात्री नसते. दोघांकडून पूर्ण भाडे आकारले जाते.

या व्यवस्थेचा प्रश्न केवळ आरामाचा नाही, तर प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या पैशाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या सुविधांचाही आहे. पुरुष आणि महिला प्रवाशांना एकाच साइड लोअर बर्थवर जागा वाटून घ्यावी लागल्यास गैरसोय आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पर्यायी जागा उपलब्ध नसल्यास तिकीट तपासनीस अर्थात TTE यांच्याही हातात फारसे काही राहत नाही. विशेषतः दिवाळी, छठपूजा आणि सुट्ट्यांच्या काळात गर्दी वाढल्यावर RAC हा अनेकांसाठी प्रवासाचा कायदेशीर आधार ठरतो. मात्र, संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने (Public Accounts Committee) फेब्रुवारी २०२६ मध्ये मांडलेल्या अहवालात चार्ट तयार झाल्यानंतरही RAC स्थितीत राहिलेल्या आणि पूर्ण बर्थ न मिळालेल्या प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारणे योग्य नसल्याचे नमूद केले. अशा प्रवाशांना भाड्याचा काही भाग परत करण्याची यंत्रणा तयार करण्याची शिफारसही समितीने केली.

RAC व्यवस्था रद्द झाली तर प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवासाची संधी, उपलब्ध बर्थचे नियोजन आणि तिकीट दर यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच केवळ सुविधा बंद करणे हा प्रश्नाचा पूर्ण इलाज नाही; वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त डबे, नव्या गाड्या आणि पारदर्शक आरक्षण व्यवस्था उभी करणेही तितकेच आवश्यक आहे. आगामी वंदे भारत स्लीपर गाड्यांमध्ये RACची तरतूद नसल्याचे वृत्त आहे; मात्र त्यावरून सर्व वंदे भारत किंवा देशातील सर्व मेल-एक्स्प्रेसमधील RAC बंद झाले, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. रेल्वेच्या अधिकृत घोषणेपर्यंत सध्याचे RAC नियम लागू आहेत. प्रवाशांना पूर्ण भाड्याच्या बदल्यात पूर्ण सुविधा मिळणार की पुन्हा आश्वासनांचीच बर्थ मिळणार, हे आगामी निर्णयातून स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *