मुंढेंच्या FDAची राज्यव्यापी धडक; १.३९ कोटींचा आरोग्यपूरक उत्पादनांचा साठा जप्त, गुटखा आणि संशयित खाद्यतेलावरही कारवाई
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। आरोग्य सुधारण्याच्या नावाखाली बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमधूनच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) राज्यव्यापी कारवाईत उघड झाला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली १३ नोव्हेंबर रोजी सहा विभागांतील १७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मान्यता नाकारलेल्या ‘मॅग्नेशियम अॅसिटाइल टॉरेट’ आणि ‘निकोटिनामाइड मोनोन्यूक्लिओटाइड’ या घटकांचा वापर करून तयार केलेल्या न्यूट्रास्युटिकल्सचा १ कोटी ३८ लाख ९५ हजार ८५२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ‘Rejuvance’, ‘Altibrain-S’, ‘Magladense’ आणि ‘EQOQ’ ही उत्पादने तपासणीच्या कक्षेत आली आहेत. उत्पादकांनी आवश्यक मंजुरी न घेता उत्पादन केल्याचा, तर विक्रेत्यांनी परवान्यात संबंधित खाद्यप्रकाराची नोंद नसताना विक्री केल्याचा FDAचा आक्षेप आहे.
या मोहिमेत केवळ सप्लिमेंट्सच नव्हे, तर प्रतिबंधित खाद्यपदार्थांवरही कारवाई करण्यात आली. मुंबईतील दहिसर पूर्व, धारावी, गोरेगाव पश्चिम आणि अँटॉप हिल येथील सहा पानटपऱ्यांमधून ३१ हजार १४९ रुपयांचा गुटखा आणि सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला. पुण्यात प्रतिबंधित खाद्यपदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह ५ लाख ६१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे Avenue Supermarts Limited च्या आस्थापनातून २१ हजार ४ लिटर संशयित निकृष्ट आणि चुकीचे लेबल लावलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत ४५ लाख ९५ हजार २६० रुपये आहे. पामोलीन, पतंजली मोहरीचे तेल, सूर्यफूल, सोयाबीन आणि कापूस बियांच्या तेलासह विविध प्रकारचे दहा नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या संपूर्ण कारवाईत जप्त केलेल्या अन्नपदार्थ, आरोग्यपूरक उत्पादनांचा आणि वाहनांचा एकत्रित आकडा सुमारे १ कोटी ९० लाख ८३ हजार ५३१ रुपयांवर पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे जप्त केलेला प्रत्येक पदार्थ अंतिम तपासणीत भेसळयुक्त किंवा विषारी ठरला आहे, असा निष्कर्ष अद्याप निघालेला नाही. प्रयोगशाळेचे अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. मात्र आरोग्याच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांना हा इशारा नक्कीच आहे. ग्राहकांनीही आकर्षक जाहिरातींना भुलून सप्लिमेंट्स खरेदी करण्याऐवजी घटक, परवाना क्रमांक आणि मुदत तपासावी. आरोग्य विकण्याचा धंदा करणाऱ्यांना नियमांची भीती वाटली पाहिजे; ग्राहकांना आजाराची!
