स्विस बँकेकडून भारतीय खात्यांचा तपशील सादर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १० ऑक्टो . – भारताला स्विस बँकेतील भारतीय नागरिकांच्या खात्यांच्या तपशिलाचा दुसरा संच मिळाला आहे. त्यामुळे या बँकेत कथितरीत्या दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे.


स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफटीए)ने बँकेतील माहिती देण्याचा करार 86 देशांशी केला आहे. भारत त्यांपैकी एक आहे. या करारानुसार बँक खात्यांच्या माहितीचा पहिला संच सप्टेंबर 2019 मध्ये बँकेने भारताला सोपवला होता. यावेळी बँकेने सुमारे 31 लाख खात्यांची माहिती या 86 देशांना दिली आहे. त्यात भारतीय व्यक्‍ती आणि संस्थांचा वाटा मोठा आहे. एफटीएनने शुक्रवारी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. जवळपास एवढ्याच खात्यांची माहिती गतवर्षी देण्यात आली होती. याशिवाय स्विस सरकारने गेल्या वर्षभरात 100 भारतीय नागरिक आणि संस्थांची माहिती भारताला सोपवली आहे. ही अशी खाती होती, ज्यांची आर्थिक गैरव्यवहारांबद्दल भारताने चौकशी सुरू केली आहे. 2018 किंवा तत्पूर्वी बंद करण्यात आलेली ही खाती आहेत.

ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फर्मेशन (एईओआय)च्या माध्यमातून बँकेतील खात्यांचा तपशील भारताला आणि इतर देशांना कळविला जात आहे. एईओआय केवळ अशा खात्यांना लागू होतो, जी सध्या सुरू आहेत किंवा 2018 मध्ये बंद करण्यात आली आहेत. ज्या खात्यांचा तपशील शुक्रवारी भारतास देण्यात आला, त्यातील अनेक खाती भारतीयांनी पनामा, सेमन आयलँड, व्हर्जिन आयलँड भागांत सुरू केलेल्या कंपन्या किंवा संस्थांची आहेत. यात बहुतेक खातेदार व्यावसायिक, काही राजकीय नेते आणि पूर्वीचे संस्थानिक आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. 31 लाख खात्यांपैकी भारतीयांशी संबंधित नेमकी किती आहेत, याचा तपशील देण्यास मात्र स्विस बँकेने नकार दिला.

खात्यांच्या तपशिलाचा पुढील संच वर्षभराने सप्टेंबर 2021 मध्ये बँकेकडून 86 देशांना पुरविला जाणार आहे. स्वित्झर्लंडने माहितीचा पहिला संच सप्टेंबर 2018 मध्ये 36 देशांना उपलब्ध करून दिला होता, परंतु त्यावेळी या यादीत भारताचा समावेश नव्हता. सध्या एफटीएकडे 8,500 वित्तीय संस्थांनी नोंदणी केली आहे. या संस्थांनी माहिती गोळा करून एफटीएकडे दिली होती. जाणकारांच्या मते, भारताला दुसर्‍या संचात मिळालेला तपशील, बेनामी मालमत्ताधारकांविरुद्ध मजबूत पुरावा ठरू शकतो. अर्थात, स्विस बँकेने खात्यांचा तपशील सरकारांना पुरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक भारतीयांनी आपली खाती बंद केली असावीत, अशी भीती तज्ज्ञ व्यक्‍त करतात.

हा तपशील मिळाला

स्विस बँकेने खातेधारकाचे नाव, खात्यातील आर्थिक व्यवहार, धनको-ऋणको, पत्ता, निवासाचा देश, कर परिचय क्रमांक, खात्यावरील जमा रक्‍कम आणि भांडवली उत्पन्‍न हा तपशील दिला आहे. या माहितीमुळे करदात्यांनी आपले खरे उत्पन्न जाहीर करून कर भरला आहे काय, हे कर वसुली यंत्रणेला कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *