महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १० ऑक्टो . – कोरोनामुळे राज्यात उद्योग- व्यवसायावर परिणाम झाला असला तरी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने कृषी क्षेत्राला सुगीचे दिवस अपेक्षित आहेत. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात दणदणीत वाढ असल्याचे राज्य सरकारकडील आकडेवारीवरून दिसून आले आहे. डाळी, अन्नधान्यापासून साखर उत्पादनात चांगलीच वाढ अपेक्षित असल्याचे आर्थिक परिस्थितीच्या अहवालावरून दिसून येते.
राज्याच्या वित्त विभागाने आर्थिक विश्लेषणाबाबत केलेल्या सादरीकरणात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात चांगली वाढ असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. राज्यातील खरीप हंगाम चांगला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरीप क्षेत्राच्या लागवडीत सरासरी 94 टक्के वाढ झाल्याचे अर्थ विभागाने केलेल्या सादरीकरणात नमूद केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात राज्यात 1. 3 कोटी हेक्टर जमिनीवर लागवड झाली.
तेलबियांचे क्षेत्र वाढले
तेलबियांच्या लागवडीतही वाढ झाली आहे. सरासरी 41.57 लाख हेक्टर क्षेत्रावरून 45.018 हेक्टर जमिनीवर तेलबियांची लागवड झाली आहे. त्यामुळे तेलबियांच्या पिकातही वाढ होण्याची चिन्हे आहेत.
ऊस लागवडीचे क्षेत्र
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. 2018 मध्ये 11 लाख हेक्टर जमीन ऊस लागवडीखाली होती. 2019 मध्ये 8.4 लाख हेक्टर जमिनीवर उसाची लागवड झाली होती. मात्र यंदा 9.1 लाख हेक्टर जमीन उसाच्या लागवडीखाली आहे. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.
साखर उत्पादनात वाढ
राज्यात साखर उत्पादनात 64 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. 2020-2021 आर्थिक वर्षात 1 कोटी टनाहून अधिक साखरेचे उत्पादन होईल असे नमूद केले आहे.
डाळींच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ
राज्यात डाळींच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या वर्षीत वाढ झाली आहे. 2018 मध्ये 20.4 लाख हेक्टर जमिनीवर डाळींची लागवड झाली होती. तर 2019 मध्ये 19 लाख हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी लागवड केली. यंदाच्या वर्षात तब्बल 21.2 हेक्टर जमीनीवर डाळींची लागवड करण्यात आली आहे.
अन्नधान्याच्या क्षेत्रातही वाढ
अन्नधान्याच्या लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे या अहवालात दाखवण्यात आले आहे. 2018 मध्ये 17.6 लाख हेक्टर जमिनीवर, 2019 मध्ये 18.6 लाख हेक्टर तर यंदाच्या वर्षात 18.7 लाख हेक्टर जमीन अन्नधान्याच्या लागवडीच्या क्षेत्राखाली आली आहे