महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १२ ऑक्टो . – नवीदिल्ली – (प्रतिनिधी) :करोनाचा उपचार आयुर्वेदिक पद्धतीने (ayurvedic treatment on corona) करण्याच्या निर्णयावर देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) तिखट प्रश्न विचारून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांना घेरल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. करोनावर आयुर्वेदिक औषधांचा काय परिणाम होतो याबाबत वैज्ञानिक अभ्यास सुरू करण्यात आल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. करोनावर आयुर्वेदिक उपचाराने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किती उपयोग होतो याबाबत वैज्ञानिक निष्कर्ष निघालेले नसताना तसे दावे का केले जात आहेत, असा प्रश्न रविवारी ‘संडे संवाद’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता.
करोनावरील उपचारासाठी आयुर्वेदित औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे उत्तर डॉ. हर्षवर्धन यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते. हे उपचार पू्र्ण साहित्याचा अभ्यास करून सुरू करण्यात आले. यात इन-सिलिको स्टडी, एक्सपेरिमेंटल स्टडी आणि क्लिनिकल स्टडी सारखे वैज्ञानिक अभ्यास केले गेले असल्याचे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाने करोना महासाथीवर आरोग्य संवर्धन आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुराव्यांच्या आधारे आयुष उपचारांना प्रोत्साहन दिले आहे. यात गुडूची, अश्वगंधा, गुडूची आणि पीपली, तसेच आयुष ६४ सारख्या औषधांचा समावेश आहे.
याबाबत अभ्यास करण्यात आला असून या औषधांची इम्यूनिटी मॉड्यूलेरिटी, अँटी व्हायरल, अँटी पायरेटिक, अँटी इन्फ्लेमेट्री प्रॉपर्टी असल्याचे या अभ्यासाअंती सिद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने स्थापन केलेल्या इंटर डिसिप्लिनरी टास्क फोर्सच्या शिफारशीवर वैज्ञानिक अभ्यासाची देखील सुरुवात झाली आहे. या वरून या औषधांचा करोनाच्या निरोधासाठी, सेकंडरी प्रिव्हेंशन आणि करोना पीडित रुग्णांच्या व्यवस्थापनांमध्ये या औषधांचा किती परिणाम होतो याचा अभ्यास केला जाणार आहे.
या पूर्वी बुधवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना प्रश्न विचारून घेरले होते. आयुर्वेदिक औषधांचा करोनावरील उपचारांसाठी उपयोग करण्यापूर्वी त्या औषधांचे वैज्ञानिक संशोधन केल्याचे पुरावे देण्यात यावेत, अशी मागणी आयएमएने केली होती.
