कोरोना हॉटस्पॉट हे पुण्याचं चित्र आता बदलणार, नव्या उपाययोजना सह प्रशासन लागलं कामाला

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि . २२ ऑक्टो – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातून आता दिलासा देणाऱ्या बातम्या येत आहेत. सलग काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असून शहराची कोरोना हॉटस्पॉट अशी निर्माण झालेली प्रतिमा पुसण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. सलग 20 दिवसांपासून नव्या रुग्णांची आणि मृत्यूची संख्याही घटत आहे. त्यामुळे अशाच उपाययोजना कायम ठेवत परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी आणखी नव्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घट कायम असून बुधवारी शहरातल्या Active रुग्णांची संख्या ही 8 हजारांवर आली आहे.बुधवारी दिवसभरात 428 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.तर दिवसभरात 758 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे.

तर काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त ठरलेल्या जम्बो कोविड सेंटरमधून आता दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. विविध प्रकारचे रुग्ण जम्बो कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी परतत आहेत. नुकतेच एका 91 वर्षीय व्यक्तीने करोनाच्या संसर्गावर मात करीत या व्हायरसवर विजय मिळविला. नारायण रामचंद्र शेलार असे या करोना योद्ध्याचे नाव आहे.डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी व विचारपूस करण्यात येत होती. तसेच, कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधता येत होता, असे सांगून शेलार यांनी जम्बोतील सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी जम्बो कोविड सेंटरमधील सर्व करोना योद्धे आणि प्रशासनाला मनोमन धन्यवाद दिले.

“सर्व प्रकारच्या रुग्णांची जम्बोमध्ये अत्यंत काळजीपूर्वक देखभाल केली जाते. प्रत्येक रुग्ण येथून ठणठणीत बरा होऊन घरी जावा यासाठी करोना योद्धे प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळून ते बरे होत आहेत हे दिलासादायक चित्र आहे,” असे जम्बो कोविड सेंटरच्या कार्यकारी अध्यक्ष व अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *