पंतप्रधान मोदींनंतर मुख्यमंत्र्यांनीही केलं जनतेला सावध; या गोष्टी टाळा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि . २२ ऑक्टो -2020 या वर्षातील जवळजवळ प्रत्येक सण कोरोना (Corona)च्या सावटाखाली साजरा होत आहे. अनेक महिन्यांच्या निर्बंधांनंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र अजूनही देशावरील कोरोनाचं संकट दूर झालेलं नाही. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सावध केलं आहे. लॉकडाऊन संपला असला तरीही कोरोना व्हायरस संपलेला नाही. अनेक लोकांनी कोरोना संपला आहे असं समजून काळजी घेणं सोडलं आहे किंवा कमी केलं आहे. परंतु जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत काळजी घ्यावी लागणार,’ असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांसोबत कोरोनाचा मुद्दादेखील मांडला. “सध्या सणाचा, उत्सवाचा माहोल असला तरी कोरोना आपल्यात आहे हे विसरुन चालणार नाही असं ते म्हणाले. कोरोनाच्या सगळ्या नियमांचं पालन करुनच सण साजरे करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.”

सणाच्या काळात बाहेर पडायचं असेल तर काही नियम नक्की पाळा. यामुळे तुम्ही, आणि तुमचे आप्तस्वकीय कोरोनापासून सुरक्षित राहतील.मास्क आणि सॅनिटायझरचा वापर: कोरोना विषाणू आपल्या शरीरावर राहू नये यासाठी सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. साबणाने हात धूत राहणंही गरजेचं आहे. याशिवाय घराबाहेर पडताना मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे.

SOP चे पालन करा: Covid-19 च्या संपर्कात न येण्यासाठी लोकांनी प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी घ्यावी. आपण आणि आपले प्रियजन सुरक्षित रहावं, यासाठी आपण काही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

कोणतीही लक्षणं तपासून घ्याः ज्यांना विषाणूचा संसर्ग झाला आहे ते रोगप्रतिकारक करू शकतात, पण त्यांना संसर्ग झाल्याचं लक्षात येत नाही म्हणूनच थोडीशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष न करता याची खात्री करा. इतरांना धोका होऊ नये यासाठी व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सण आपल्या घरीच कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करा. कुटुंबातील ज्या सदस्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांची काळजी घ्या.

गृहितकं टाळा : जगभरात अनेक लोकांना Covid-19 ची लागण झाली आहे आणि बरेच लोक त्यातून बरे सुद्धा झाले आहेत. परंतु ह्या कारणांनी काही लोक निष्काळजीपणा दाखवत प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करत नाहीत आणि असा विचार करतात की, त्यांना हा रोग होणार नाही किंवा झाला तरी बरा होईल. परंतु या रोगावरची लस जगात कुठेही नसल्यामुळे असा विचार करून चालणार नाही. अशाने पुन्हा संक्रमण आणि तीव्रतेचं प्रमाण वाढू शकतं.

बाहेरचं खाणं टाळा: शिजवलेल्या अन्नातून या विषाणूचा प्रसार होतो असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, तरीही आपण सणादरम्यान घराबाहेर न खाणं चांगलं. गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे पोटातील इतर संक्रमणदेखील होऊ शकतं त्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *