महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ ऑक्टो – ‘गो कोरोना गो’ म्हणणारे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे दोन्ही नेते मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत.
कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने रामदास आठवले यांनी सोमवारी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आठवले यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी ट्विट करत आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. माझी प्रकृती उत्तम असून आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.