महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ ऑक्टो – देशातील ‘अनलॉक-५’च्या गाईडलाईनची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. ३० सप्टेंबरला ही गाईडलाईन जारी करण्यात आली होती.यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत सुरुच राहणार आहे. याचबरोबर आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी कोणतीही बंधने टाकण्यात आलेली नाहीत. तसेच मालवाहतूक किंवा प्रवासासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
गेल्या पाच आठवड्यांपासून कोरोनामुळे मृतांचा सरासरी आकडा कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा ९०.६२ टक्क्यांवर आला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. देशातील एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७८ टक्के रुग्ण हे १० राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, प. बंगाल. दिल्ली, छत्तीरगढ आणि कर्नाटकमध्ये ५८ टक्के मृत्यू होत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
उत्सव काळात केरळ, महाराष्ट्र, प. बंगाल, कर्नाटक आणि दिल्लीतील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. १० लाख रुग्णांचा बरे होण्याचा वेग हा गेल्या १३ दिवसांवर आला आहे. कोरोना पसरविण्यास कारणीभूत असलेले कार्यक्रम टाळल्यास कोरोना आटोक्यात येईल. मोठ्या संख्येनेच नाही तर कमी संख्येने देखील लोक एकत्र आल्यास कोरोना फैलाव होऊ शकतो, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले.