मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो व्हायरल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ नोव्हेंबर ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा शिवाजी पार्क जिमखाना इथे एकत्र टेनिस खेळतानाचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याआधी देखील राज ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो समोर आला होता. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर तो पोस्ट करण्यात आला होता.  अमित ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत होते .

राज ठाकरेंचं टेनिस प्रेम यामुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे हे क्रिकेट खेळत असे. पण एकदा पायाला जोरात बॉल लागल्यामुळे त्यांनी क्रिकेट खेळणं सोडलं. यामागे ज्येष्ठ राजकीय पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या ‘ठाकरे कझिन्स’ पुस्तकात त्याबाबत उल्लेख देखील आहे. बॉल लागल्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना म्हणाले होते की, ‘आज तुझ्या पायावर बॉल लागून पाय सुजला आहे. उद्याहातावर बॉल लागला आणि हात सुजला तर व्यंगिचत्रिकार होण्याचं स्वप्नाचं काय?’ यानंतरच राज ठाकरे यांनी क्रिकेट खेळणं सोडल्याचं बोललं जातं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणात आता आणखी अॅक्टीव्ह झाले आहेत. लॉकडाऊन नंतर त्यांच्या पक्षाने अनेक मुद्द्यांवर आंदोलन केलं. स्वत: राज ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वीच राज्यपालांची देखील भेट घेतली. राज ठाकरे यांना फॉलो करणारे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेल्यानंतर आता मनसे भाजप सोबत येणार का अशी देखील चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे. सध्या तरी असं कोणतंही चित्र नसलं तरी पुढे काहीही होऊ शकतं. कारण राजकारणात काहीही अशक्य नसतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *