महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ नोव्हेंबर ; कोरोनाचे कारण पुढे करत कर्नाटक सरकारने मराठी भाषक सीमाबांधवांचा ‘काळा दिन’ दडपण्याचा प्रयत्न केला. मूक सायकल फेरीस परवानगी नाकारली. तरीसुद्धा तितक्याच त्वेषाने मराठी भाषकांनी महाराष्ट्रात जाण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे दाखवून दिले. भाषावार प्रांतरचनेत जबरदस्तीने कर्नाटकात घुसडल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे सीमाभागात कडकडीत हरताळ व काळा दिन पाळण्यात आला. काळी वस्त्र व काळे झेंडे फडकवत ठिकठिकाणी धरणे आंदोलने झाली. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही पुणाच्या बापाचे’, ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणांनी सीमाभागासह महाराष्ट्रही दुमदुमून गेला होता
भाषावार प्रांतरचना वेळी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 मराठी भाषिक गावे जबरदस्तीने कर्नाटकात घुसडण्यात आली. कर्नाटक राज्योत्सव असलेल्या 1 नोव्हेंबर रोजी सीमा बांधव हरताळ व काळा दिन पाळून लोकशाही मार्गाने मूक सायकल फेरी काढतात. आज 65 व्या वर्षीही सीमावासीयांची चौथी पिढीसुद्धा या सीमालढा आंदोलनात उत्स्फूर्तपणे सक्रिय झाली. महाराष्ट्रातील मंत्र्यांसह नेत्यांनी रविवारी काळ्या फिती लावून मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याने, मराठी भाषकांमध्ये आत्मविश्वास दुणावल्याचे तर कर्नाटकाचा तिळपापड झाल्याचे दिसून आले.