महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ नोव्हेंबर ; चेन्नईसाठी माझी ही शेवटची मॅच नाही, नक्कीच नाही असं धोनीने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये सांगितल्याने चेन्नईच्या वास्तूपुरुषाचं कर्तेपण धोनीकडेच राहील हा चाहत्यांसाठी आशेचा किरण आहे. प्रतिस्पर्धी संघांना घरी धाडून दिमाखात बादफेरीत जाणारा चेन्नईचा विजयरथ यंदा लीग स्टेजला गाळात रुतला. बारा वर्षांपूर्वी आयपीएल अवतरलं तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिलावहिला ट्वेन्टी-20 वर्ल्डकप पटकावला होता.
लांब केसांचा, धष्टपुष्ट शरीरयष्टीचा, मिश्कील हसणारा आणि पल्लेदार फटके मारणारा रांचीचा राजकुमार माही अर्थात महेंद्रसिंग धोनी दूरवरच्या चेन्नईच्या ताफ्यात गेला. तेव्हा कोणाला वाटलंही नव्हतं की धोनी चेन्नईकरांचा लाडका थाला होईल.धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज हे एकमेकांचे समानार्थी शब्द होतील. धोनी आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईत दाखल होई तेव्हापासून जल्लोषाला उधाण येई. धोनीच्या सराव सत्राला हजारो चाहत्यांची गर्दी उसळत असे.
आयपीएलच्या निमित्ताने फ्रँचाईज पद्धतीचं क्रिकेट आपल्याकडे रुजवण्यात आलं. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी चेन्नईकरांना धोनीरुपी बीज दिलं. एक तपानंतर चेन्नईकरांच्या थालाचा लोकप्रियतेच्या, जिंकण्याच्या, जेतेपदांच्या बाबतीत डेरेदार वृक्ष झाला आहे.महेंद्रसिंग धोनीच्या या संघाने जिंकण्याची सवय अंगी बाणवली. चाहत्यांनाही तीच सवय लावली. धोनीच्या या संघाने ओल्ड स्कूल थिकिंगची तत्वं अंगीकारली. कॉर्पोरेट कल्चरमध्ये ‘हायर अँड फायर’ नीती राबवली जाते.
धोनी आणि चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने लिलावात विचारपूर्वक खेळाडू घेतले. त्या माणसांवर विश्वास ठेवला. संपूर्ण हंगाम फॉर्मसाठी झगडणाऱ्या खेळाडूवरही चेन्नईने विश्वास ठेवला.अनेकदा संपूर्ण हंगामभर चेन्नईची प्लेइंग इलेव्हन कायम असे. खेळणारे खेळत, बेंचवरचे बेंचवर बसत. पण कधीही बंडाचा एल्गार, संधी न मिळाल्याची तक्रार ऐकू आली नाही.
“तुम्ही अवघड कामगिरी हाती घेता, या वाटेवर खाचखळगे लागतात. तरी तुम्ही हार मानता चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन वाटचाल करता. कटू क्षण तुमचं मनोधैर्य हिरावू पाहतात पण तुम्ही अविचल राहता. 2020 वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच आघातांचं राहिलं आहे. पण काहीही झालं तरी आपण खेळत राहू”- भैरवीची, निरोपाची ही पोस्ट आहे चेन्नई सुपर किंग्सची.