महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ नोव्हेंबर – मुंबई -कोरोना कालावधीमध्ये जास्त वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत निर्णय होणार आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राऊत म्हणाले की, कोविड कालावधीमध्ये अनेकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला. तसेच घरामध्ये राहावे लागल्यामुळे अधिक वीज बिले आली. त्यामुळे या वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे.
राऊत पुढे म्हणाले की, राज्यातील सूत गिरण्या, कापड गिरण्या यांनाही सवलतीच्या दराने वीजपुरवठा करणे तसेच प्रलंबित वीज जोडण्यांचे अर्ज गतीने कशा प्रकारे निकाली काढता येतील त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कृषिपंप वीज जोडणी धोरणाबाबत निर्णय होणार असून त्यामुळे प्रलंबित कृषिपंप वीज जोडण्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असेही ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
रीडिंगप्रमाणेच अचूक बिल
शेतीला विनाव्यत्यय वीजपुरवठा करणे, वीज ग्राहकांना विजेचे देयक मीटर रीडिंगप्रमाणेच मिळावे, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे या बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. राज्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी वीज सवलती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत अनेक उद्योगांशी सामंजस्य करार झाल्याचे दिसून येईल, असे डाॅ. राऊत यांनी सांगितले.