महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ नोव्हेंबर – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्यापही हाती आला नसून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर असून विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पुन्हा एकदा मतमोजणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांना चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये असं म्हटलं आहे.
अटीतटीच्या राज्यात मतमोजणी पूर्ण झाली नसली, तरी शुक्रवारी जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया या महत्त्वाच्या राज्यांमध्ये बायडेन यांनी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली. टपाली मतांची मोजणी हा गैरप्रकार असल्याचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटले असले, तरी त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षपदाची शक्यता बऱ्यापैकी धूसर बनलेली दिसून येते.
विजय निश्चित असल्याने जो बायडेन यांनी आपलं जन्मठिकाण विल्मिंगटन येथे सभा आयोजित केली होती. या ठिकाणी ते विजय जाहीर करतील असं बोललं जात होतं. मात्र अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी अद्यापही अधिकृतपणे विजयी घोषित केलेलं नाही, त्यामुळे हा नियोजित कार्यक्रम रद्द करुन दुसरा मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव झाल्याचं मान्य करण्यास तयार नाहीत. अनेकदा त्यांनी स्वत:ला विजयी म्हणून घोषितही करुन टाकलं आहे. जो बायडेन विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं मान्य करण्यास ते तयार नाही. नुकतंच त्यांनी ट्विट केलं असून जो बायडेन यांना इशारा देत म्हटलं आहे की, “जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये. मीदेखील तसा दावा करु शकतो”.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक ट्विट केलं असून आपण आघाडी घेतली असताना ती अचानक गायब झाल्याचा दावा केला आहे. “निवडणुकीच्या रात्री मला या सर्व राज्यांमध्ये आघाडी होती. पण ही आघाडी अचानक गायब होताना दिसत आहे. कदाचित आमची कायदेशीर प्रक्रिया पुढे जाईल त्याप्रमाणे आघाडी परतेल,” असं ते म्हणाले आहेत.
ट्रम्प यांच्यावर माध्यमे, स्वपक्षीयांकडूनही टीका
मोक्याच्या राज्यांमध्ये पिछाडीवर पडत असल्याची कुणकुण लागताच डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बिथरले आणि त्यांनी व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत डेमोक्रॅटिक पक्ष आणि माध्यमांवर आरोपांचा वर्षांव केला. त्यामुळे वैतागून अमेरिकेतील बहुतेक वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांच्या बेताल बडबडीचे प्रक्षेपणच थांबवले. ट्रम्प यांच्या पक्षातील काही लोकप्रतिनिधी, तसेच रिपब्लिकन पक्षाचे जुनेजाणते वकील बेंजामिन गिन्सबर्ग यांनीही ट्रम्प यांना पराभव मान्य करण्याचा सबुरीचा सल्ला दिला. ट्रम्प यांनी अमेरिकेतील घटनात्मक संस्थांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर आणि अनावश्यक असल्याचे मत या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.