महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ नोव्हेंबर – न्यूयॉर्क : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन विजयी झाले आहेत. तर उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे कमला या अमेरिकेतील पहिल्याच महिला उपराष्ट्राध्यक्ष असणार आहेत.
तामिळनाडूतील थुलसेंद्रपूरम हे कमला हॅरिस यांचे मूळ गाव आहे. या गावातच कमला यांच्या आजोबांचाही जन्म झाला आहे. तसेच हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात झाला आहे. त्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या आणि तिकडेच स्थायिक झाल्या. कमला यांना घेऊन त्या नेहमी आपल्या कुटुंबाला भेटायला भारतात येत होत्या. कमला यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन हे नंतरच्या काळात चेन्नईला स्थायिक झाले. आपण पाच वर्षाचे असताना आजोबांसोबत थुलसेद्रपूरम या मूळ गावी फेरफटका मारल्याचे कमला यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन सांगितले होते.
दरम्यान, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिल्या आशियायी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. याआधी अमेरिकेत दोन महिलांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून सारा पॅलिन यांना, तर 1984 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून गिरालडिन फेरारो यांना उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता कमला यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे.