पु. ल. ना जयंतीनिमित्त ‘गूगल’ची मानवंदना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ नोव्हेंबर – पुणे -आता गूगलने देखील साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा क्षेत्रांत योगदान दिलेल्या पु. ल. देशपांडे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली असून ‘गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या विभागात पुलंच्या १०१व्या जयंतीनिमित्त पुलंच्या जीवन आणि कार्याचा वेध घेणारे अनोखे प्रदर्शन समाविष्ट करून गूगलने पुलंना मानवंदना दिली आहे.

नुकतेच पुलंचे जन्मशताब्दी वर्ष (२०१८-१९) झाले, तर पुलंचा आज(८ नोव्हेंबर) १०१वा जन्मदिन आहे. गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर विभागातील पुलंविषयीचे खास दालन या निमित्ताने खुले करण्यात आले आहे. आशुतोष आणि दिनेश ठाकूर यांनी पुलंचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱ्या या ऑनलाइन प्रदर्शनासाठी विशेष सहकार्य केले आहे. त्यामुळे मराठीजनांनी आतापर्यंत अलोट प्रेम केलेले पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

पुलंच्या बहुआयामी योगदानाचा गूगलने केलेल्या दालनामध्ये वेध घेण्यात आला आहे. त्याला दुर्मिळ छायाचित्रे, ध्वनिचित्रफितींचीही जोड देण्यात आली आहे. पुलंचा जन्म आणि त्यांचे आयुष्य, लेखन, त्यांच्या चित्रपट, नाटकांची पोस्टर्स, पुलंनी चित्रपट-नाटकात केलेल्या अभिनयाच्या ध्वनिचित्रफिती, त्यांची काही भाषणे, टपाल तिकीट, तसेच आयुका, मुक्तांगण, आनंदवन अशा संस्थांसाठी केलेले सामाजिक काम अशा वेगवेगळ्या अंगाने हे प्रदर्शन सजवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *