महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ नोव्हेंबर – मुंबई : राज्यात अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई दिवाळीच्या पूर्वी देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला असला तरी पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेच्या तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीचा मुहूर्त हुकणार आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई दिवाळीनंतर मिळण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर-आॅक्टोबर काळात राज्यात मोठी अतिवृष्टी झाली होती. त्याच्या भरपाईसाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने १० हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. ही मदत दिवाळीपूर्वी अपाद्ग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागच्या आठवड्यात दिले होते.
मात्र राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता लागणार आहे. येत्या शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी दिवाळीस प्रारंभ होत आहे. राज्य सरकारच्या हाती केवळ ४ दिवसांचा वेळ आहे. शनिवारपर्यंत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मदत वाटपासाठी संमती दिलेली नव्हती. राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ती मिळेल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अजून सुरूच आहेत, असे मदत व पुनर्वसन विभागतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळेही मदत देण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.