महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ नोव्हेंबर – पुणे : दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. मात्र, विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहता सरकारने घाईघाईने निर्णय घेऊ नये, अशी मागणी होऊ लागली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांची घाई अनाकलनीय आहे.
शाळा सुरू झालेल्या राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेता येऊ शकेल. तसेच, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना पुन्हा किमान काही दिवस घरी राहायला लागेल. त्यावेळी त्यांचा अभ्यास बुडेल, समजा शिक्षकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचा वर्ग काही दिवसांसाठी बंद करावा लागेल. त्याशिवाय पालकांनी मुलांना शाळेत जाण्यासाठी कशाच्या आधारे सहमती द्यावी, याकडेही गांभिर्याने पहायला हवे.
तसेच, या निमित्ताने शाळा पुन्हा पालकांना फी भरण्याची सक्ती करतील आणि शुल्क वसुलीच्या मागे लागतील. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केली आहे.